तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन संपन्न 

पारनेर / ता. प्रतिनिधी  
जिल्हा परिषद अहिल्यानगर व पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन २०२६ हे आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. विविध प्रकारच्या पशुधनाचे आकर्षक प्रदर्शन, गुणवंत पशुपालकांचा सन्मान आणि बक्षीस वितरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.



यावेळी बोलताना आमदार दाते यांनी पशुपालकांच्या कष्टांचे कौतुक करत सांगितले की, “तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली जनावरे येथे आणली आहेत. ही केवळ जनावरे नसून त्यांच्या कष्टाचे, जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी जनावरांचे संगोपन करत आहे, हे कौतुकास्पद आहे.”


“मांजर, शेळी, कोंबडीपासून ते गाय, म्हैस, बैल आणि घोड्यांपर्यंत विविध पशुधन या प्रदर्शनात पाहायला मिळाले. काही पशुपालकांकडे आठ-दहा गायींचे गोठे आहेत, तर काहींनी उत्कृष्ट जातीचे बैल व जनावरे जोपासले आहेत. पिंपळनेर येथील दिंडीच्या रथाची बैलजोडी तसेच इतर उत्कृष्ट पशुधन पाहून आनंद झाला. या प्रदर्शनामुळे पशुपालन क्षेत्राला नवी दिशा मिळेल.”

प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितले की, “अशा प्रकारचे उपक्रम शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे ठरतात. कमी जलस्रोतांमध्येही चाऱ्याचे नियोजन करून पशुधन टिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे कार्य आदर्श आहे. शासनाच्या विविध योजनांमधून पशुपालकांना सातत्याने मदत मिळत असून या क्षेत्राला बळकटी देण्याचे काम सुरू आहे.”

पशुप्रेमाबाबत बोलताना आमदार दाते म्हणाले की, “जनावरांचे संगोपन करताना आर्थिक भार व कष्ट मोठे असतात, मात्र छंद आणि प्रेमामुळे शेतकरी त्यांना मुलांप्रमाणे जपतो. हाच खरा पशुप्रेमाचा अर्थ आहे.”

शेवटी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत सर्व सहभागी पशुपालकांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनामुळे तालुक्यातील पशुपालकांना प्रोत्साहन मिळून पशुपालन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा येथे दुधाळ व प्रजननक्षम जनावरांची पुढील पिढी तयार करण्यासाठी भ्रूणप्रत्यारोपण कार्यशाळा प्रभावीपणे सुरू आहे. पूर्वी पशुपालन हा केवळ जोडधंदा म्हणून केला जात होता, मात्र आता बदलत्या काळानुसार गावागावात पशुसंवर्धन उद्योजक निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. आमदार काशिनाथ दाते यांनी जिल्हा परिषदेत असताना आपत्तीग्रस्त पशुपालकांसाठी गायीसाठी १० हजार व शेळ्या-मेंढ्यांसाठी ३ हजार रुपयांची मदत देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनासोबत लोकप्रतिनिधींचेही असेच सहकार्य राहिले, तर पशुपालकांना भविष्यात निश्चितच चांगले दिवस येतील, असा विश्वास आहे.

– डॉ. तुंभारे मा. उपायुक्त पशुसंवर्धन 

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “कार्यक्रम पत्रिकेत पहिले तर अनेक विभागाची नावे आहेत पण ते आज उपस्थित राहिले नाहीत. शासनाच्या कार्यक्रमाला शासकीय कर्मचाऱ्यानी अशा पद्धतीने गैरहजर राहणे योग्य नाही. शिवाय अधिवेशन चालू आहे, अधिवेशन काळात कुठल्याही अधिकाऱ्याने मुख्यालय न सोडण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही आज अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित नाहीत. आपला हा मेसेज त्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत जाईल व उद्याच्या काळात ते सर्वजण शासनाच्या कुठल्याही विभागाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा मला विश्वास वाटतो.”

– आमदार काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version