कुकडी व पिंपळगाव जोगा डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. दातेंचा पुढाकार
पारनेर / ता. प्रतिनिधी
मंगळवार दि. २४ फेब्रुवारी २०२६ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन दोन महत्त्वपूर्ण निवेदने सादर केली. कुकडी डावा कालवा तसेच पिंपळगाव जोगा डावा कालवा आवर्तन तातडीने सोडण्याबाबत त्यांनी ठोस मागणी केली.
आमदार दाते सर यांनी दिलेल्या पत्रानुसार, कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच ओलिताखालील पीक क्षेत्र व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता आवर्तन दि. ०१ मार्च २०२६ रोजी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुख्य अभियंता, कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे व अधिक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे यांना तातडीच्या सूचना देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
तसेच पिंपळगाव जोगा डावा कालवा हा मतदारसंघातील अनेक गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असून सध्या पाणीपातळी खालावल्याने तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी दुसऱ्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
शेतकरी हिताला प्राधान्य देत पाणी प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार दाते सर यांच्या या प्रयत्नांमुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पिकांचे संरक्षण व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची सोय सुनिश्चित करण्यासाठी आमदार दाते सरांचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी निवेदनाची दखल घेत संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन देत केलेल्या मागणीचा विचार करत कुकडी डाव्या कालव्याद्वारे १ ते ५ मार्च दरम्यान तर २५ फेब्रुवारी ते १ मार्च च्या दरम्यान पिंपळगाव जोगा डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येईल असा विश्वास दिला आहे.
– आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)
