पारनेर / भगवान गायकवाड, 
       राजकारणात पद मिळाले की अनेकदा बडेजाव आणि प्रसिद्धीचा झगमगाट ओघानेच येतो. मात्र, याला अपवाद ठरत पारनेरचे पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांनी आपल्या कृतीतून ‘राजकारणापेक्षा समाजकारण श्रेष्ठ’ असल्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. निमित्त होते पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित ‘महाआरोग्ययज्ञ’ शिबिराचे.खासदार निलेश लंके यांचा वाढदिवस, ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृती निमित्त या भव्य महाआरोग्ययज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पारनेर तालुक्यातील दुर्गम भागातून आणि खेडेपाड्यातून हजारो गरजू रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी आले होते. रुग्णांची ही अलोट गर्दी पाहून यंत्रणेवर मोठा ताण येत होता.

शिबिरात तपासणी झाल्यानंतर औषध वाटप केंद्रावर रुग्णांची मोठी रांग लागली होती. मनुष्यबळ कमी पडत असल्याने औषधे मिळण्यास विलंब होत होता आणि रुग्णांचे हाल होत होते. ही बाब नगरसेवक योगेश मते यांच्या लक्षात आली. सामान्यतः अशा वेळी लोकप्रतिनिधी केवळ सूचना देऊन मोकळे होतात, मात्र मते यांनी कुठलाही बडेजाव न मिरवता थेट औषध वाटप केंद्रात प्रवेश केला.
पुढारपणाचा मुखवटा बाजूला सारून त्यांनी स्वतः औषधांची पाकिटे तयार करणे आणि रुग्णांना ती समजावून सांगण्यास सुरुवात केली. दुपार पासून ते शिबिर संपेपर्यंत त्यांनी अत्यंत समर्पित भावनेने ही सेवा करत होते.
विशेष म्हणजे, हे काम करत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचे फोटोसेशन केले नाही किंवा समर्थकांचा गराडा सोबत ठेवला नाही. फोटोसाठी पोझ देण्याच्या या काळात, प्रसिद्धीच्या झगमटापासून दूर राहून त्यांनी दिलेली ही साथ उपस्थितांच्या मनाला भावली.

पारनेर ग्रामीण रुग्णालयातील या शिबिरात योगेश मते यांची ही ‘सायलेंट सर्व्हिस’ पाहून शिबिरासाठी आलेल्या रुग्णांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. लोकप्रतिनिधी असावा तर असा, अशाच भावना ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटत होत्या. केवळ भाषणे न ठोकता प्रत्यक्ष कामात झोकून देण्याच्या त्यांच्या या वृत्तीमुळे तालुक्यात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
माझ्यासाठी हे केवळ शिबिर नसून तो एक सेवायज्ञ होता. तालुक्यातील गरीब रुग्णांना वेळेवर औषध मिळणे महत्वाचे होते. पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा माणसांची सेवा करणे मला जास्त आनंददायी वाटते.
       – नगरसेवक योगेश मते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version