“ऑपरेशन सिंदूर” भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला, पाकिस्तानला दिला कठोर संदेश – विश्वनाथ कोरडे

पारनेर/ प्रतिनिधी, 
भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबवत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईत भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलाने संयुक्तपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सिंदूर’ हे नाव दिले, कारण पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनेक महिलांचे सौभाग्य हिरावले गेले. भारतीय सैन्याने क्षेपणास्त्रांनी विविध ठिकाणांवर अचूक हल्ले करत लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या तळांना भुईसपाट केले. या कारवाईत दहशतवादी मारले गेले, तर नागरी हानी टाळण्यात भारताला यश मिळाले.

भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी या ऑपरेशनचे जोरदार स्वागत केले. ते म्हणाले, “पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ होती. पहलगाम हल्ल्याने देशवासीयांच्या मनात संताप होता. ऑपरेशन सिंदूरने भारताने आपली ताकद आणि दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईची तयारी दाखवली आहे. पंतप्रधान मोदी आणि सैन्याचे हे यश प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे असे आहे.” कोरडे यांनी पुढे सांगितले की, भारताने केवळ बदला घेतला नाही, तर दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडले आहे.

या ऑपरेशननंतर देशभरात जल्लोष साजरा झाला. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये नागरिकांनी फटाके फोडून आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आपला आनंद व्यक्त केला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरैशी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, हे ऑपरेशन अचूक गुप्तचर माहिती आणि नियोजनाचा परिपाक होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version