बेल्हा-शिरूर रस्त्याचे काम पुन्हा सुरु”

पारनेर / ता. प्रतिनिधी,  

बेल्हा-शिरूर या महत्त्वाच्या मार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असताना काही ठिकाणी आंदोलनामुळे ते अचानक ठप्प झाले होते. विशेषतः निघोज एस.टी. बसस्थानक परिसरात काम बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. खराब रस्त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत शंभरहून अधिक दुचाकी अपघात घडल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक व मानसिक फटका बसला होता. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर “आपली माती आपली माणसं” या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश ढवण यांनी आमदार काशिनाथ दाते सर यांची भेट घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली. तसेच पारनेर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

जनतेच्या या भावना लक्षात घेऊन आमदार दाते सरांनी तात्काळ जिल्हाधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दि. ३१ मार्चपूर्वी काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या या ठोस हस्तक्षेपानंतर बुधवार दि. १८ मार्चपासून रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे.

आमदार दाते यांच्या तत्पर निर्णयक्षमतेमुळे आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीमुळे हे काम मार्गी लागल्याने निघोज परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. “बोलण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणारे नेतृत्व” अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत असून मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

या कामाच्या पुर्नप्रारंभाबद्दल पारनेर तालुका पत्रकार संघ, रुपेश ढवण (आपली माती आपली माणसं), निघोज ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ व कुलाबा मंडळ यांच्या वतीने आमदार काशिनाथ दाते यांचे आभार मानण्यात आले.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “निघोज परिसरातील रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही परिस्थिती आम्ही आमदार काशिनाथ दाते सरांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत काम पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या तत्पर निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. विकासकामांप्रती असलेली त्यांची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.”

– रुपेश ढवण (आपली माती आपली माणसं)

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “निघोज परिसरातील रस्त्याचे काम बंद पडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार दाते सरांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून काम सुरू करण्याचे आदेश दिले, ही त्यांच्या कार्यतत्परतेची जाणीव करून देणारी बाब आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून विकासकामांबाबत त्यांची बांधिलकी स्पष्ट झाली आहे. पत्रकार म्हणून जनतेचा आवाज योग्य पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका यशस्वी ठरल्याचे समाधान आहे.”

– दत्ताजी उनवणे, जेष्ठ पत्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version