शेतकरीहिताला प्राधान्य देण्याचे खा. लंके यांचे आवाहन
पारनेर : प्रतिनिधी,
पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खासदार नीलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सभापती गंगाराम बेलकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बाजार समितीने आर्थिक प्रगती साधत सन २०२३ मधील तोट्याच्या स्थितीतून आज चार कोटी रुपयांच्या नफ्यात झेप घेतली असून राष्ट्रीयीकृत बँकेत ३ कोटी ७२ लाख रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
खासदार नीलेश लंके म्हणाले, बाजार समितीचा कारभार शेतकरी केंद्रित असला पाहिजे. शेतकरी जगला तरच बाजार समिती उर्जितावस्थेत येईल. त्यामुळे संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेत शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील, याचा विचार करावा. बाजार समितीच्या प्रगतीचे श्रेय व्यापारी, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाजार समितीच्या जडणघडणीत योगदान देणारे दिवंगत व्यापारी पांडुरंग काळे तसेच मारुती रेपाळे, नंदकुमार देशमुख, राजेंद्र तारडे यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांच्या योगदानाचा खासदार लंके यांनी गौरव केला. आदर्श शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा बाजार समितीच्या वतीने करण्यात आलेला सन्मान हा प्रेरणादायी उपक्रम असून असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सभापती गंगाराम बेलकर यांनी सांगितले की, बाजार समितीला जागेची अडचण भासत असून पारनेर नगरपंचायतीने साडेदहा एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून संचालक मंडळाकडून पाठपुरावा सुरू आहे. ही जागा उपलब्ध झाल्यानंतर बाजार समितीच्या विस्ताराला मोठी चालना मिळणार आहे.
बाजार समितीकडे येण्यासाठी पूर्वी चांगला रस्ता नव्हता. मोठमोठे खड्डे असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीला अडचणी येत होत्या. संचालक मंडळाच्या मागणीनंतर खासदार नीलेश लंके यांनी काँक्रीटच्या दर्जेदार रस्त्यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद केल्याचे बेलकर यांनी सांगितले.
पारनेर शहरातील २२ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून पाणी आणण्याच्या योजनेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही बेलकर यांनी दिली.
संचालक अशोक कटारिया यांनी कांद्याबरोबरच मूग, टोमॅटो, वाटाणा आणि डाळिंबासाठीही बाजार समितीत विक्री व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. जागा उपलब्ध झाल्यानंतर या सुविधा निर्माण करता येतील, असे त्यांनी सांगितले. भाळवणी येथे उपबाजार सुरू करण्यात आला असून टाकळी ढोकेश्वर येथेही उपबाजार सुरू करण्यासाठी सरपंच बाळासाहेब खिलारी यांनी जागा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी सभापती बाबाजी तरटे, किसन रासकर, किसन सुपेकर, रा या औटी, बापूसाहेब शिर्के, शिवाजीशेठ बेलकर, अशोक सावंत, विजय पवार, अशोक कटारिया, मारुती रेपाळे, संदीप सालके, चंदन भळगट, पद्मजा पठारे, नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे, डॉ. श्रीकांत पठारे, योगेश मते, अर्जुन भालेकर, दीपक लंके, धोंडीभाऊ पुजारी, तुकाराम चव्हाण, भूषण शेलार यांच्यासह संचालक, व्यापारी, शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.
सभापती गंगाराम बेलकर यांनी प्रास्ताविक केले. सचिव सुरेश आढाव यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. मोहन रोकडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बाजार समितीच्या वतीने आदर्श शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
