टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी,
लोकनेते खासदार निलेश लंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त (१० मार्च) आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्ण झालेल्या ६० वर्षांचा गौरव करण्यासाठी तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाआरोग्ययज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे भव्य महाआरोग्ययज्ञ शिबिर ८ आणि ९ मार्च २०२६ रोजी पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या पूर्वसूचनेसाठी आणि जनजागृतीसाठी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण पत्रक देण्यात आले आणि खाऊ वाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना शिबिराला उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्र राजदेव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष मळीभाऊ रांधवण, विक्रम झावरे, विलास ठुबे, नांदूर पठारचे मा. सरपंच भानुदास आग्रे, जनार्दन चौधरी, रविंद्र चौधरी, रामदास राजदेव, प्रणव पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून ग्रामस्थांना मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक औषधे उपलब्ध होणार असून, लोकनेते निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखालील निलेश लंके प्रतिष्ठान आणि स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रयत्नांतून हा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे. ग्रामस्थांनी या महाआरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा कार्यक्रम जनसेवा आणि आरोग्य जागृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
