अहिल्यानगर / भगवान गायकवाड, 

अहिल्यानगरचा गौरवशाली इतिहास, ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक वारसा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे स्व. भूषण देशमुख यांनी २०१६ पासून सुरू केलेला ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम आता त्यांच्या स्मृती जपत अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प शहरातील इतिहासप्रेमींनी केला आहे. यापुढे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नुकतेच ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात स्व. भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ विशेष ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शंभराहून अधिक इतिहास आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. उपक्रमाची सुरुवात स्व. भूषण देशमुख यांच्या आवाजातील नगरच्या इतिहासाची ध्वनिमुद्रित माहिती ऐकवून करण्यात आली, ज्याने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.

सतीश गुगळे यांनी यावेळी फराहबक्ष महालाची निर्मिती, वास्तुशैली आणि वैशिष्ट्यांची रंजक माहिती दिली. यासोबतच पंकज मेहेर, ठाकूर परदेशी, अमोल बास्कर, प्रफुल्ल पवार, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, ॲड. शाम असावा आणि सलीम सहारा यांनीही ऐतिहासिक वारशावर सविस्तर प्रकाश टाकला.



या उपक्रमात ‘एक पेड… भूषण सर के नाम’ या संकल्पनेतून खिरणीचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. चेतन मेहता, भूषण यांचे चिरंजीव मोहित आणि सून ऋतुजा यांच्या हस्ते हे वृक्षारोपण झाले. पर्यावरण मित्र अमित गायकवाड आणि तुषार लहारे यांनी चांदबिबी महालावरील खिरणीच्या बियांपासून तयार केलेली शेकडो रोपे या चळवळीद्वारे परिसरात लावली जाणार आहेत. भविष्यात प्रत्येक हेरिटेज वॉकच्या वेळी ‘भूषण स्मृती वृक्ष’ लावून पर्यावरण आणि इतिहास जतनाचा संदेश कृतिशील करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवले आहे.



भरत बागरेचा आणि कलीमभाई रामपूरवाला यांनी तयार केलेले लेखणी स्वरूपातील स्मृतिचिन्ह उपस्थितांना भेट देऊन उपक्रमाची सांगता झाली. “इतिहास जपला तरच वारसा टिकेल आणि वृक्ष जपले तरच भविष्य संरक्षित होईल,” हा संदेश देत या चळवळीने नगरच्या सांस्कृतिक जडणघडणीत आपले योगदान सुरू ठेवण्याचा दृढनिश्चय केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version