पारनेर / भगवान गायकवाड, 
     तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या पारनेर ग्रामीण रुग्णालयाचा गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला पाण्याचा प्रश्न आमदार काशीनाथ दाते (सर) यांच्या पुढाकारामुळे अखेर मार्गी लागला आहे. रुग्णालयातील कूपनलिकेची (बोअरवेल) मोटर नादुरुस्त झाल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई आता दूर झाली असून, नवीन मोटर बसवल्याने रुग्ण आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

पारनेर ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील आरोग्यसेवेचे मुख्य केंद्र आहे. मात्र, अचानक कूपनलिकेची मोटर नादुरुस्त झाल्याने रुग्णालयाचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. रुग्णालयातील स्वच्छता, शस्त्रक्रिया गृह आणि रुग्णांच्या दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्याअभावी प्रशासनाची मोठी ओढाताण होत होती. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.
सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांनी या गंभीर समस्येबाबत आमदार काशीनाथ दाते सर यांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली होती.रुग्णांचे हाल होत असल्याचे समजताच आमदारांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाला या प्रश्नावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत नवीन मोटर बसवून पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
मोटर दुरुस्त होईपर्यंतच्या काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार काशीनाथ दाते, सावित्री-फातिमा सद्भावना मंचचे कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद आणि पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. या सामाजिक बांधिलकीमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता.
आमदारांच्या या तत्परतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल पारनेर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. या कार्यामुळे रुग्णालयाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version