चाटे किड्स व जिजामाता कन्या विद्यालयात स्नेहालय संस्थेचा उपक्रम

पारनेर भगवान गायकवाड, 
बालविवाह ही केवळ सामाजिक समस्या नसून तो कायद्याने गुन्हा आहे. किशोरवयीन मुला-मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बालविवाह रोखणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन समन्वयक निशा वाघ यांनी केले. स्नेहालय संस्था (अहिल्यानगर) संचलित ‘उडान’ प्रकल्पांतर्गत पारनेर येथील चाटे किड्स आणि जिजामाता कन्या विद्यालय येथे बालविवाह प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘उडान’ प्रकल्पाच्या समन्वयक कु. निशा वाघ आणि कु. प्रतीक्षा वाघ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम सविस्तरपणे समजावून सांगितले. कमी वयात विवाह केल्यामुळे मुलींच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, शिक्षणात येणारे अडथळे आणि कायद्यातील कठोर तरतुदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. समाजात असा प्रकार घडत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रशासनाला किंवा ‘चाईल्ड हेल्पलाईन’ला कळवण्याचे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. सादिक राजे, विश्वस्त फहाद राजे, ॲड. भारती तराळ, आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष ठाणगे यांनीही आपले विचार व्यक्त केले. पत्रकार शशिकांत भालेकर आणि स्नेहालय संस्थेचे प्रतिनिधी पत्रकार भगवान गायकवाड यांनी सामाजिक प्रश्नांवर पत्रकारांची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी राणी औटी, नंदा चेडे, बेबी मोढवे, सुनंदा बोरुडे, सारिका बोरुडे, सारिका वाघमारे यांच्यासह केदारे मॅडम,करंदीकर मॅडम , साळवे मॅडम,आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी “आम्ही बालविवाह करणार नाही आणि आमच्या परिसरात कोणाचाही बालविवाह होऊ देणार नाही,” अशी शपथ घेतली. केवळ कायदे करून बालविवाह थांबणार नाहीत, तर त्यासाठी तरुण पिढीमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या उपक्रमाचे पारनेर परिसरातून कौतुक होत असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षक या मोहिमेत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version