सेनापती बापट विद्यालयात ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा

पारनेर / भगवान गायकवाड, 
समाजातील ज्वलंत प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार अहोरात्र कष्ट करत असतात. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पारनेर येथील सेनापती बापट विद्यालयात ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीनिमित्त पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती चेअरमन अनिल भंडारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार मार्तंडराव बुचुडे (सर), तालुका अध्यक्ष उदय शेरकर, शशिकांत भालेकर, संतोष सोबले, भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कासार, क्रिडा शिक्षक सुनील गायकवाड आणि संजय पतके यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

     विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार मार्तंडराव बुचुडे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील आव्हाने मांडली. ते म्हणाले की, “पत्रकारिता ही केवळ एक व्यवसाय नसून ती समाजाची सेवा करण्याचे प्रभावी माध्यम आहे. समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतो. मात्र, हे करत असताना अनेकदा अपमानही सोसावा लागतो. पत्रकारिता हे एक ‘दुधारी शस्त्र’ आहे, ज्याचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि नैतिकतेने करणे आवश्यक आहे.”

अध्यक्षीय भाषणात अरुण भंडारी यांनी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, सेनापती बापट विद्यालयाने हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागृत केल्याचे त्यांनी नमूद केले. 


कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक रावसाहेब कासार यांनी आभार मानले. तर पत्रकार दिन यशस्वितेसाठी मनोज मुळे सर, बनकर सर, गायकवाड डी बी, सौ.रायसोनी सौ . हापसे, प्रणव खेडकर, कदम ताई यांनी परिश्रम घेतले.

   शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे महत्त्व समजावे, या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version