पारनेर / प्रतिनिधी,  

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सरांनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या शिष्यवृत्तीबाबत सरकारचे लक्ष वेधले. या प्रश्नावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शिष्यवृत्तीच्या रकमेत महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्याचा विषय शासनाच्या विचाराधीन असल्याची महत्त्वपूर्ण माहिती सभागृहात दिली.

आमदार दाते यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमध्ये राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा पट वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सद्यस्थिती, प्रलंबित शिष्यवृत्ती आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती वाढीची गरज यावर सविस्तर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणातील विलंब, निधीची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा मुद्दाही सभागृहात मांडला.

यावर उत्तर देताना मंत्री संजय शिरसाट यांनी नागपूर जिल्ह्यासह विविध भागांतील पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रकरणांची माहिती सभागृहासमोर ठेवली. विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आल्याचे सांगत शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती दिली.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 आमदार काशिनाथ दातेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शिरसाट यांनी “सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतील शिष्यवृत्तीची रक्कम महागाई निर्देशांकानुसार वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे” त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये सुधारणा आणि लाभार्थ्यांना अधिक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आमदार दाते यांनी अधिवेशनात केलेली ही मागणी महत्त्वपूर्ण मानली जात असून, सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शिष्यवृत्ती वाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version