पारनेर महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा कर्जुले हर्या येथे समारोप
पारनेर / भगवान गायकवाड,
“राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही केवळ एक योजना नसून ती विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी चळवळ आहे. रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिकच नव्हे तर सर्वांगीण विकास होतो. शिबिरातील सहवासामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभाव हे गुण वाढीस लागतात, तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास होतो,” असे प्रतिपादन डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
हे शिबिर श्री हरेश्वर देवस्थान, कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथे “शाश्वत विकासासाठी युवक: पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन” या विषयावर ७ ते १३ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडले.
डॉ. खिलारी पुढे म्हणाले की, “शिबिराचा कालावधी हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. येथे मिळालेल्या संस्कारांची आणि अनुभवाची शिदोरी विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्याच्या वाटचालीत वापरावी. समाजाशी आणि मातीशी नाळ जोडण्याचे काम या शिबिरांनी केले आहे.”
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘नगर सह्याद्री’चे संपादक आणि देवस्थानचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव शिर्के उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिबिरातून मिळालेल्या अनुभवातून विद्यार्थ्यांनी आपापल्या गावाचा विकास साधावा. राळेगण सिद्धी किंवा हिवरे बाजार प्रमाणे आपली गावेही आदर्श बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
समारोप प्रसंगी देवस्थानचे सचिव श्री. एकनाथ दाते यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव केला. श्री हरेश्वर मंदिर परिसरात स्वयंसेवकांनी केलेल्या श्रमदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनीही, “विद्यार्थ्यांनी आळस झटकून राष्ट्रकार्यात योगदान द्यावे,” असे आवाहन केले.
शिबिरात प्रा. अशोक शिंदे, प्रा. तुषार ठुबे, सौ. सुरेखा सरोदे, प्राचार्य डी. आर. जाधव आणि शिवव्याख्याते श्री. दत्तात्रय कुलट या मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच ‘काव्ययोग काव्य संस्था, पुणे’ यांच्या वतीने आयोजित कवी संमेलनात शरदचंद्र काकडे देशमुख, सपना राठोड व इतर कवींनी कविता सादर केल्या. स्वयंसेवक संकेत पवार आणि कोमल माळी यांच्या स्वरचित कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.
शिबिरास जिल्हा समन्वयक प्रा. गणेश निमसे यांनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन डॉ. हनुमंत गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. माया लहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. महेश आहेर यांनी केले. नागेश्वर, छत्रपती शासन, मृत्युंजय, हरेश्वर आणि सिद्धेश्वर ग्रुपच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
