पारनेर / भगवान गायकवाड,
शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मोहोर उमटवणारे युवा आर्किटेक्ट सुरज बाळासाहेब इघे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल लोहार समाज विकास संघ आणि लोहार युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर मेळावा व गुणवंत सत्कार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.
११ जानेवारी २०२५ रोजी अहिल्यानगर येथे हा भव्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.जे.एन.टी. ओबीसी विभागाचे राज्याचे जॉईंट डायरेक्टर संतोष हराळे होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाच्या भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण कोठे, अखिल लोहार समाज विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप दादा थोरात आणि लोहार युथ फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष किशोरभाऊ सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच, स्वागताध्यक्ष प्रा. हर्षल आगळे, महसूल अधिकारी राजेंद्र लाड, पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, राहुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दशरथराव पोपळघट, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे, सोमनाथ हरेल आणि प्रा. प्रभाकर लाड या मान्यवरांच्या हस्ते सुरज इघे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सुरज इघे यांनी केवळ राज्यातच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. ८ जुलै २०२४ रोजी त्यांनी चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, फिलिपिन्स, थायलंड, श्रीलंका, इराण आणि सिंगापूर अशा १५ देशांतील तज्ज्ञ आणि स्पर्धकांच्या उपस्थितीत जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केले होते.या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल निप्पॉन पेंट इंडियाचे प्रमुख मार्क टायटस यांच्या हस्ते त्यांना सुवर्ण करंडक आणि ५०,००० रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या याच जागतिक कामगिरीची दखल घेत आता त्यांना राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
समाजातून कौतुकाचा वर्षाव….
अतिशय खडतर प्रवासातून आणि जिद्दीच्या जोरावर आर्किटेक्चर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय यश संपादन करणाऱ्या सुरज इघे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. लोहार समाजातील युवकांसाठी सुरज हा एक आदर्श असून, त्याच्या या यशामुळे समाजाची मान उंचावली असल्याची भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
या पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर झेप घेण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास राज्यभरातून लोहार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
