पारनेर, दि. ९ (प्रतिनिधी) : कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. महायुती सरकार त्यादृष्टीने प्रयत्नशील असून, राज्यातील दुष्काळ ही परिस्थिती आता भूतकाळात जाईल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
कुकडी लाभक्षेत्रातील डाव्या कालव्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जवळा येथे करण्यात आला. यावेळी आमदार काशिनाथ दाते, महायुतीचे पदाधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर तालुक्यातील गांजी भोयरे येथे रस्ते विकासकामाचे लोकार्पणही करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पारनेर तालुका दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्ध कामाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या नियोजनानुसार या सर्व उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून लाभक्षेत्रातील गावांना त्याचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
कालव्यांची वहन क्षमता वाढविण्यावर भर…
महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाच्या माध्यमातून कालव्यांच्या नूतनीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. कालव्यांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यातून होणारी पाण्याची गळती रोखणे आणि पाण्याची वहन क्षमता वाढविणे, हा या कामांचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याबरोबरच भविष्यात धरणांची साठवण क्षमता वाढविणे आणि अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे, हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सिंचनाचा विस्तार होऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेर तालुक्यात ३२०० शेतकऱ्यांना २४ कोटींचा लाभ….
महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफी आणि वीजबिल माफीसंदर्भात घेतलेल्या निर्णयांचाही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी उल्लेख केला. या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील सुमारे ३२०० शेतकऱ्यांसाठी २४ कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
🔶🔶🔶🔶🔶
पारनेर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा…
पारनेर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे, अशी भूमिका तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच घेतली पाहिजे होती, असे मतही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आणि मालकीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कुकडी प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध पाण्याचा प्रभावी वापर, कालव्यांचे नूतनीकरण, उपसा सिंचन योजनांची अंमलबजावणी आणि अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांमुळे पारनेर तालुक्याच्या सिंचन क्षेत्राला आगामी काळात मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
