गरजू नागरिकांना मोफत शस्त्रक्रिया, प्रवास व उपचाराची संपूर्ण जबाबदारी

अहिल्यानगर : प्रतिनिधी 

             समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि जेष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश लंके प्रतिष्ठानने लौकिकाप्रमाणे समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवारी ३२ जेष्ठ नागरिक तसेच माता-भगिनींना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरत असून, लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळण्याची आशा दिसून येत होती.

           मोतीबिंदूमुळे अनेक जेष्ठ नागरिकांची दृष्टी कमी होत असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. मात्र शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेकजण उपचारांपासून वंचित राहतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन निलेश लंके प्रतिष्ठानने गरजू लाभार्थ्यांची निवड करून त्यांना पुण्यातील तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांकडून मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था, शस्त्रक्रियेचा खर्च, आवश्यक तपासण्या, औषधोपचार तसेच इतर वैद्यकीय सुविधांची संपूर्ण जबाबदारी प्रतिष्ठानने स्वीकारली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी उपचारांमध्ये अडथळा ठरू नयेत, याची काळजी घेण्यात आली आहे.


            खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश लंके प्रतिष्ठान आरोग्य, शिक्षण, सामाजिक विकास आणि जनकल्याणाच्या विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे, गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत करणे, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविणे अशा विविध माध्यमांतून प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत आहे. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा हा उपक्रमही त्याच सेवाभावी कार्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

             मोफत शस्त्रक्रियेसाठी पुण्याकडे रवाना होताना लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खासदार डॉ. नीलेश लंके तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू नागरिकांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण होत असून, पुन्हा एकदा स्वच्छ आणि स्पष्ट दृष्टीने जीवन जगण्याची संधी मिळत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version