पारनेर / ता. प्रतिनिधी,

 स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त पारनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांपैकी “स्व. अजितदादा पवार स्मृती चषक” पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना व बक्षीस वितरण सोहळा राळेगण थेरपाळ येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्पनेतून पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला खेळाडू व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साईराम ११, शिरूर आणि मांडवगण फराटा या बलाढ्य संघांमध्ये रंगतदार लढत झाली. प्रथम फलंदाजी करत साईराम ११, शिरूर संघाने ७३ धावांचे आव्हान उभे केले. मात्र हे आव्हान समर्थपणे पेलत मांडवगण फराटा संघाने शानदार खेळी करत अंतिम सामना जिंकून “स्व. अजितदादा पवार स्मृती चषक” आपल्या नावावर केला. अंतिम सामन्याने उपस्थित क्रीडाप्रेमींना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यास पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले तसेच विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण केले. यावेळी त्यांनी “अमर रहे… अमर रहे… अजितदादा अमर रहे…! एकच वादा… अजितदादा…! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडत उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषदचे माजी सदस्य वसंतराव चेडे, जिल्हा सरचिटणीस सुधामती कवाद, लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात, नगरसेवक अशोक चेडे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, दिनेश बाबर, उपाध्यक्षा रेश्मा गलांडे, रमेश वरखडे, स्वप्नील ठुबे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार काशिनाथ दाते म्हणाले, “स्वर्गीय अजितदादा पवार यांनी युवकांना नेतृत्व, विकास आणि समाजसेवेची प्रेरणा दिली. क्रीडा स्पर्धा केवळ मनोरंजनासाठी नसून युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि जिद्द निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. अशा विधायक उपक्रमांमधून सक्षम व सुसंस्कृत पिढी घडते. विकास पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले उत्कृष्ट आयोजन निश्चितच कौतुकास्पद आहे.”

यावेळी आमदार काशिनाथ दाते यांनी अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या साईराम ११, शिरूर आणि विजेता मांडवगण फराटा या दोन्ही संघांचे विशेष अभिनंदन केले. तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आर्थिक सहकार्य करणारे सर्व दाते, प्रायोजक, संघमालक आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नावानिशी आभार मानत त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विकास पवार, नाणू सोनवणे, मोतीराम कारखिले, मयूर तिखोळे तसेच राळेगण थेरपाळच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजन, भव्य पारितोषिके आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे या स्पर्धेने तालुक्यात विशेष छाप पाडली असून, युवकांना विधायक दिशेने प्रेरित करणारा हा उपक्रम म्हणून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
◼️ “स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेट स्पर्धा म्हणजे युवकांना एकत्र आणणारा आणि त्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांना वाव देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे. विकास पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून स्पर्धेला भव्य स्वरूप दिले आहे. आमदार मा. काशिनाथ दाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा विधायक उपक्रमांमधून राष्ट्रवादी काँग्रेस समाजहिताची आपली बांधिलकी अधिक प्रभावीपणे जपत आहे.”

– अशोकराव सावंत (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version