पारनेर / भगवान गायकवाड,
“स्वतःसाठी तर सारेच जगतात, पण खऱ्या अर्थाने जगण्याचे सार्थक तेव्हाच होते जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो.” हे मानवी जीवनाचे मर्म क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून पावलोपावली उमजते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मूल्याधिष्ठित आणि पायाभूत समाज निर्मितीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. सावित्रीबाई फुले ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक स्वतंत्र विचारधारा आहे. याच विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सावित्री फातिमा सद्भावना मंच वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तनपुरेवाडी ( निघोज)येथील विद्यार्थिनी आणि महिला वर्गासाठी मंचचे कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद यांच्या वतीने ‘मूल्यनिष्ठ सावित्री’ या पुस्तिकेच्या एकूण १५० प्रती सप्रेम भेट देण्यात आल्या.
आजच्या धावपळीच्या युगात सावित्रीबाईंच्या विचारांची सुसंगत मांडणी होणे गरजेचे आहे . डॉ.प्रशांत राऊत यांनी सामाजिक भावनेतून सद्यस्थितीचा समतोल साधत सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित हे लिखाण केले आहे. हे विचार समाजातील तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. शाळेचे शिक्षक गौतम साळवे यांच्याकडे हे पुस्तक संच सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. रफिक सय्यद म्हणाले की, “सावित्रीबाईंच्या विचारांवर स्वतंत्र दृष्टिकोनातून केलेले हे लिखाण महिला वर्गाला आत्मभान देणारे ठरेल. त्यांच्या कार्याची खरी ओळख नवीन पिढीला आणि महिलांना व्हावी, हाच यामागील मुख्य हेतू आहे.”
शिक्षक गौतम साळवे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले. ते म्हणाले की, शाळे मधील पालक मेळाव्यामध्ये या पुस्तिका महिला पालकांपर्यंत आणि विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवल्या जातील, ज्यामुळे समाजात मूल्यांची जोपासना होण्यास मदत होईल.सावित्री-फातिमा सद्भावना मंचने राबविलेल्या या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाचे पारनेर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या पुस्तकांमुळे ग्रामीण भागातील महिलांना सावित्रीबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची नव्याने ओळख होणार आहे.
