अहिल्यानगर २०२७ पर्यंत बालविवाहमुक्त करण्याच्या ध्येयाने असुरक्षित वस्त्यांमध्ये स्नेहालय उडानची घराघरांत जनजागृती

अहिल्यानगर : भगवान गायकवाड, 
बालविवाह रोखणे, बालकांचे संरक्षण करणे आणि बालविवाहग्रस्त बालकांचे पुनर्वसन करणे या त्रिसूत्री उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाने अहिल्यानगर जिल्हा २०२७ अखेरपर्यंत बालविवाहमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय स्वीकारले आहे. या ध्येयपूर्तीसाठी उडान प्रकल्प ग्रामीण भागातील प्रत्येक गावात आणि शहरी भागातील प्रत्येक असुरक्षित वस्तीत पोहोचून व्यापक जनजागृती अभियान राबवत आहे. अशी माहिती स्नेहालय संस्थेचे उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी दिली.

     याच अभियानाचा भाग म्हणून सिद्धार्थ नगर येथील डॉ. कलाम बालभवन आणि झोपडपट्टी परिसरात विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रविण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बालभवन समन्वयक विना वेडेपल्ली, सामाजिक कार्यकर्ते कुणाल कदम, प्रतीक्षा वाघ आणि स्वयंसेवक सानिका जावळे यांनी नागरिक, पालक आणि बालकांशी थेट संवाद साधला.बालविवाहाच्या घटनांचा अभ्यास करताना असे आढळून आले आहे की, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या असुरक्षित वातावरणात वाढणाऱ्या मुली बालविवाहाच्या जोखमीला अधिक सामोऱ्या जातात. विशेषतः झोपडपट्टी परिसरात शिक्षणाचा अभाव, असुरक्षितता, गरिबी आणि जागृतीचा अभाव यामुळे बालविवाहाची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे बालविवाह रोखायचा असेल तर सर्वप्रथम अशा वस्त्यांमध्ये पोहोचणे आवश्यक आहे, या विचारातून उडान प्रकल्पाने झोपडपट्टी भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.या अभियानादरम्यान बालविवाह प्रतिबंध कायदा, बाल लैंगिक शोषण प्रतिबंध, बालकांचे मूलभूत हक्क, शिक्षणाचे महत्त्व, बालसुरक्षा तसेच १०९८ चाईल्ड हेल्पलाईनची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. कार्यकर्त्यांनी घरोघरी भेट देत कुटुंबांशी संवाद साधला, माहितीपत्रकांचे वितरण केले आणि बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले.विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ जनजागृतीपुरता मर्यादित नसून स्थानिक पातळीवर कायमस्वरूपी संरक्षण यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न आहे. यासाठी डॉ. कलाम बालभवन, अंगणवाडी सेविका, स्थानिक नागरिक आणि समुदाय नेत्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. प्रत्येक झोपडपट्टी, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक बालकापर्यंत पोहोचून बालविवाहाविरोधात सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी उडान प्रकल्प सातत्याने प्रयत्नशील आहे.बालविवाहमुक्त झोपडपट्टी, सुरक्षित बालपणाची हमी” या संकल्पनेतून सुरू असलेल्या या अभियानाद्वारे शेकडो नागरिकांपर्यंत जनजागृती पोहोचली. बालकांचे शिक्षण, संरक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक सेवा वस्ती बालविवाहमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत उडान प्रकल्पाची ही मोहीम आता सामाजिक परिवर्तनाच्या व्यापक चळवळीत रूपांतरित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version