पारनेर / भगवान गायकवाड, 
पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय भव्य पशू-पक्षी प्रदर्शन २०२६ मध्ये, पुणेवाडी येथील प्रगतशील पशुपालक श्री. पोपटराव रेपाळे यांच्या गोठ्यातील गायींनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे. विशेषतः दैनिक ४२ लिटर दूध उत्पादन क्षमता असलेल्या त्यांच्या उत्कृष्ट HF (होल्स्टीन फ्रीजियन) जातीच्या गायीसह एकूण तीन गायींनी प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यात पुणेवाडीचे नाव उंचावले आहे.

*४२ लिटर दुधाचा विक्रम आकर्षणाचे केंद्र*
या प्रदर्शनात रेपाळे परिवाराची ४२ लिटर दूध देणारी HF गाय सर्वांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन क्षमता आणि गायीचे सुदृढ आरोग्य पाहून तज्ज्ञ परीक्षक आणि उपस्थित पशुपालक थक्क झाले. या गायीसोबतच त्यांच्या इतर दोन संकरित गायींनीही आपापल्या गटात बाजी मारली. एकाच गोठ्यातील तीन-तीन गायींनी प्रथम क्रमांक पटकावल्याने रेपाळे परिवाराच्या आधुनित पालनावर शिक्कामोर्तब झाले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
युवा शक्ती आणि अनुभवाची जोड….
श्री. पोपटराव रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची मुले श्री. अनिल, श्री. विकास आणि श्री. सुनील पोपटराव रेपाळे हे तिघेही पशुपालन व्यवसायात अहोरात्र कष्ट घेत आहेत. या प्रदर्शनासाठी गायींची तयारी करणे, त्यांचा आहार, आरोग्य आणि प्रदर्शनातील मांडणी यासाठी या तिन्ही भावांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या या सामूहिक कष्टाचे फळ म्हणून आज रेपाळे परिवाराच्या तीन गायींनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले आहे.
 

🔶🔶🔶🔶🔶🔶
आदर्श पशुपालन….
“हा विजय केवळ आमचा नसून आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीचा आहे. माझे वडील पोपटराव रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि माझे भाऊ अनिल, विकास व सुनील आम्ही सर्वजण या मुक्या प्राण्यांची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतो,”या यशात डॉ. शेखर ठुबे यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले अशी भावना रेपाळे बंधूंनी यावेळी व्यक्त केली.
 
🔶🔶🔶🔶🔶🔶 
गावाकडून अभिनंदनाचा वर्षाव…..
पुणेवाडीच्या या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रदर्शनाच्या सांगता समारंभात मान्यवरांच्या हस्ते रेपाळे परिवाराचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पुणेवाडीचे नाव पशुपालन क्षेत्रात उंचावल्याबद्दल सर्व स्तरांतून पोपटराव रेपाळे आणि त्यांच्या तिन्ही मुलांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version