पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघाच्या वतीने यावर्षी ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांचे औचित्य साधून भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समता सैनिक दल शताब्दी वर्ष आणि चवदार तळे सत्याग्रह शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ‘चक्रवर्ती सम्राट अशोक महान तालुकास्तरीय जयंती प्रबोधन महोत्सव’ आणि ‘मौलिक अधिकार संरक्षण परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
हा सोहळा गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता, जामगाव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संपन्न होणार आहे.
या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ उत्सव साजरा करणे हा नसून, नागरिकांच्या संवैधानिक मुलभूत हक्कांप्रती जागृती निर्माण करणे हा आहे. सालाबादप्रमाणे होणाऱ्या आगामी तालुकास्तरीय संयुक्त जयंती महोत्सवाच्या रूपरेषेबाबत आणि पारनेर तालुक्यातील विविध गावोगावी आयोजित केल्या जाणाऱ्या जयंती उत्सवांच्या तारखांचे नियोजन करण्यासाठी याप्रसंगी विशेष चर्चा व विचारविनिमय करण्यात येणार आहे. तालुकास्तरीय संयुक्त जयंती प्रबोधन महोत्सव समिती तालुका पारनेर, राहुल नगर मित्र मंडळ आणि तालुक्यातील सर्व पुरोगामी संघटना व मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमात सम्राट अशोक यांच्या धम्मविजयाचा वारसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मौलिक अधिकारांच्या संरक्षणाबाबत प्रबोधन केले जाणार आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, विचारवंतांनी आणि भीमसैनिकांनी या नियोजित बैठकीस व प्रबोधन महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, जेणेकरून संपूर्ण तालुक्यात एकोपा आणि नियोजित पद्धतीने उत्सवाचे आयोजन करता येईल,” असे आवाहन आयोजक राजेंद्र करंदीकर यांनी केले आहे.
