पारनेर | ता. प्रतिनिधी,

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर घरकुल योजनांतील रखडलेल्या कामांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करत हजारो गोरगरीब कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचा ठाम प्रयत्न केला. राज्यातील लाखो लाभार्थ्यांची अपूर्ण घरकुले, रखडलेले हप्ते, तांत्रिक अडचणी आणि वाढत्या बांधकाम खर्चामुळे सर्वसामान्यांची होत असलेली परवड त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

आमदार दाते यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील हजारो घरकुले अद्याप अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित केला. लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते मिळत नसल्याने, SPARSH प्रणालीतील तांत्रिक त्रुटी, तसेच सिमेंट, लोखंड व इतर बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक गरीब कुटुंबांना कर्ज काढून घराचे बांधकाम करावे लागत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली.

याशिवाय, जुनी घरे पाडल्यानंतरही नवीन घरकुल अपूर्ण राहिल्याने अनेक कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्यात दिवस काढावे लागत असल्याचे सांगत, रखडलेले हप्ते तातडीने वितरित करावेत, तांत्रिक अडचणी दूर करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अनुदानात वाढ करण्याची ठोस मागणी त्यांनी शासनाकडे केली.

यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी SNA SPARSH प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. तसेच वाढत्या बांधकाम खर्चाचा विचार करून शासनाने अतिरिक्त अनुदान मंजूर केले असून, घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. पावसाळ्यापूर्वी अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version