अहिल्यानगर / भगवान गायकवाड,
वर्ष 1998 मध्ये अहिल्यानगर आणि संगमनेर येथे पोलीस उपाधीक्षक म्हणून काम करीत असताना स्नेहालय संस्थेची होणारी जडणघडण जवळून पाहिली. समर्पित कार्यकर्त्यांच्या रक्त आणि धामातून उभे राहिलेले स्नेहालयाचे प्रकल्प भारत विकासाचे सुकाणू आणि दिव्य आशा असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले…
स्नेहालय संस्थेच्या इसळक ( ता.नगर) येथील हिम्मतग्राम प्रकल्पात नव्याने बांधण्यात आलेल्या स्नेहसाधना संकुलाचे उद्घाटन श्री. कराळे यांच्या हस्ते आज झाले. अध्यक्षस्थानी भारताचे संयुक्त राष्ट्र संघटनेतील प्रतिनिधी आणि इंग्लंड सह अनेक देशातील माजी राजदूत कमलेश शर्मा होते. राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीसह अनेक दात्यांच्या मदतीने एड्सबाधित आणि अत्याचारपीडित 50 महिलांच्या पुनर्वसनासाठी हे संकुल बांधण्यात आले.
यावेळी श्री. कराळे यांनी हिम्मतग्राम मधील शेती, दुग्धोत्पादन, फलोत्पादन, पॉलिहाऊस , सेंद्रिय शेती, मानसिक आरोग्यावरील मानसग्राम इ . प्रकल्पांना भेटी दिल्या. येथील लाभार्थ्यांशी संवाद केला.
श्री कराळे म्हणाले की, एकाच संस्थेद्वारे महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यात लोकसहभागातून राबवले जाणारे 27 सेवा प्रकल्प हा केवळ समर्पित कार्यकर्त्यांच्या सामूहिक शक्तीचा अविष्कार आहे. बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात राबवला जाणारा उडान प्रकल्प, अत्याचारांच्या विरोधातील बाल स्नेह आधार उपक्रम, बालकांची अनैतिक मानवी वाहतूक आणि तस्करी रोखणारी मुक्तीवाहिनी विविध अत्याचार पिढीत महिलांसाठीची स्नेहाधार हेल्पलाइन , देह व्यापारातील बळी महिलांसाठीचा स्नेहज्योत प्रकल्प या महिला आणि बालकेंद्रित प्रकल्पातील स्नेहालयची कार्यशैली अद्भुत परिणामकारक आहे. तिचे अनुकरण भारताचे सामाजिक चित्र बदलू शकते.
यावेळी स्नेहालयाचे राजीव गुजर, जयाताई जोगदंड, राजीव कुमार , संचालक अनिल गावडे, हनीफ शेख, ॲड.श्याम असावा, प्रवीण कदम, गणेश झुगे, चंद्रकांत शेंबडे, रमाकांत दोड्डी आणि हिम्मत ग्राम प्रकल्पातील लाभार्थी उपस्थित होते. संतोष धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.
