टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी,
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून मंजूर असलेल्या आरडीएसएस अंतर्गत सिंगल फेज वीज कनेक्शनच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या योजनेचे काम अद्याप सुरू न झाल्याने आणि अनेक शेतकऱ्यांना कनेक्शन न मिळाल्याने उद्या सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता उपअभियंता, विद्युत वितरण कंपनी कार्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे अधिकाऱ्यांना बांगड्या घालून कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रवींद्र राजदेव यांनी दिला आहे.
रविंद्र राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्या शेतकऱ्यांना अद्याप सिंगल फेज कनेक्शन मिळाले नाही, त्यांनी ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता टाकळी ढोकेश्वर येथील महावितरण कार्यालयात हजर राहावे आणि आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. विद्युत वितरण कंपनी कडून सिंगल फेज वीज कनेक्शन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजदेव यांनी सांगितले की, खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नाने तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या योजनेचा लाभ अद्याप अनेकांना मिळाला नाही. सिंचन आणि शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या या वीज कनेक्शन अभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या आंदोलनामुळे उद्या टाकळी ढोकेश्वर परिसरात वीज वितरण कंपनी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन आणि महावितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
