अहिल्यानगर : प्रतिनिधी,
सह्याद्रीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखालील आपला मावळा या सामाजिक संघटनेमार्फत दर महिन्याला आयोजित करण्यात येणारी गटकोट संवर्धन व स्वच्छता मोहिम या महिन्यात किल्ले लोहगड येथे रविवार दि.२९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी १० मार्च रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खा. लंके यांनी या मोहिमेची घोषणा केली होती. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एका रविवारी ही मोहीम विविध गडांवर आयोजित करण्यात आलेली आहे. या मोहीमेत युवक व नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड हा मराठा इतिहासातील महत्वाचा गड असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याला विशेष रणनीतिक महत्व होते. गडावरील तटबंदी, दरवाजे आणि विंचूकाटा सारखी वैशिष्टये आजही इतिहासाची साक्ष देतात. मात्र वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे निर्माण होणारा कचरा आणि पर्यावरणीय ताण लक्षात घेता, या गडाच्या संवर्धनची गरज अधोरेखित होते.
या पार्श्वभूमीवर रविवार दि.२९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता लोहगडावर ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान गडावरील स्वच्छता, प्लॉस्टिक कचरा निर्मूलन, पायवाटांची निगा, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन यावर भर दिला जाणार आहे. स्वयंसेवकांना गटांमध्ये विभागून नियोजनबध्द पध्दतीने काम केले जाणार असून, पर्यावरण संरक्षणाबाबतही मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गड आपले, जबाबदारीही आपली या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
खा. लंके मुक्कामी….
खा. लंके यांच्यासह मोहीमेत सहभागी होणारे मावळे हे शनिवारी सायंकाळीच गडाच्या पायथ्याशी मुक्कामी थांबणार आहेत. सकाळी सात वाजताच या मोहीमेस प्रारंभ करण्यात येणार असून सहभागी होणा-या इच्छुकांनी रविवारी सकाळी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
