पारनेर / भगवान गायकवाड,
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, घसरलेल्या भावामुळे उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि अखिल भारतीय किसान सभा, पारनेर तालुक्याच्या वतीने शुक्रवार, दि. ६ रोजी दुपारी १२ वाजता पारनेर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे, मात्र त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कांदा पिकासाठी झालेला खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांदा बाजारभाव स्थिर ठेवावेत, अशी मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली आहे. कांदा निर्यातीवरील जाचक निर्बंध शिथिल करून निर्यातीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन द्यावे.
नाफेड किंवा तत्सम शासकीय संस्थांमार्फत थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून बफर स्टॉक तयार करावा,कांद्यासाठी किमान आधारभूत दर निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना कांदा अनुदान जाहीर करावे आणि वाहतूक खर्चात सवलत द्यावी, बाजार समित्यांमधील बारदाना, कडता आणि इतर अनावश्यक कपाती त्वरित थांबवाव्यात या मागण्या करण्यात येणार आहे.या आंदोलनाचे नियोजन भाकप आणि किसान सभा पदाधिकारी कॉ. बबन सालके, कॉ. सुभाष ठुबे, कॉ. कैलाश शेळके, कॉ. बबन रावडे, कॉ. संतोष खोडदे, कॉ. संतोष रावडे, कॉ. बापू गायकवाड, कॉ. अशोक गायकवाड आदींनी केले आहे. “तालुक्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.
