आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये बैठका
हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरणार
टाकळी ढोकेश्वर परिसरात आंदोलनाची जय्यत तयारी
पारनेर/प्रतिनिधी :
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे रोजी नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गटाचे खंबीर नेते आणि नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले जाणार असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टाकळी ढोकेश्वर परिसरातील गावांमध्ये रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या बैठका होत आहेत व या बैठकांच्या माध्यमातून आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे.
सध्या बाजारात कांद्याला मिळणारा भाव अत्यंत कमी असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, निर्यातबंदी कायमस्वरूपी हटवावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीपंपांचे वीज बिल माफ करावे आणि पीकविम्याची रक्कम तातडीने मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. रवींद्र राजदेव यांनी या आंदोलनाबाबत माहिती देताना सांगितले की, शेतकरी सध्या आर्थिक संकटात असून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या बेतात आहेत. जर सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, तर हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करेल.
रवींद्र राजाराम राजदेव हे पारनेर तालुक्यातील एक सक्रिय सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ‘जनसेवक’ अशी प्रतिमा असलेल्या राजदेव यांनी यापूर्वीही रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या प्रश्नांवर यशस्वी लढे दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्न असलेले राजदेव हे निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून, त्यांना सोनियाताई राजदेव यांची ग्रामीण विकासाच्या कामात मोठी साथ लाभते.
या रस्ता रोको आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून आणि ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून चर्चेचे प्रयत्न झाले असले तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे कांदा उत्पादकांचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये बैठका..
टाकळी ढोकेश्वर परिसरातील पिंपळगाव रोठा, वडगाव सावताळ, सावरगाव, नांदूर पठार, काटाळवेढा, पळसपुर म्हसोबा झाप, पोखरी, खडकवाडी, देसवडे या भागात नगर कल्याण महामार्गावर कांदा प्रश्नी रस्ता रोको रवींद्र राजदेव यांचे नेतृत्वाखाली करण्यात येणारे आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असून प्रत्येक गावात ठिकाणी बैठका घेऊन आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे मोठ्या संख्येने हजारो शेतकरी ट्रॅक्टर बैलगाडी सह रस्त्यावर उतरणार आहेत.
