पारनेर : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी मंत्रालयात मंत्र्यांची किंवा अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मुंबईत यावे लागते. मात्र मंत्रालयात प्रवेशासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, सामान्य जनतेला सकाळी ११ वाजताच मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी पारनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मोहन सुभाष रोकडे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रोकडे यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या कामांसंदर्भात मंत्रालयात मंत्री अथवा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येत असतात. अनेक नागरिक मोठा प्रवास करून मुंबईत दाखल होतात. मात्र मंत्रालयात प्रवेश मिळविताना त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात कामानिमित्त येताना दोननंतर प्रवेश दिला जातो, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या कामासाठी योग्य वेळी संबंधित मंत्री किंवा अधिकाऱ्यांची भेट घेता यावी, यासाठी सकाळी ११ वाजताच मंत्रालयात प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती रोकडे यांनी केली आहे.

सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन मंत्रालयातील प्रवेश व्यवस्थेत सुलभता आणल्यास राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version