पारनेर / भगवान गायकवाड,
आरोग्य सेवा ही केवळ व्यावसायिक नसून ती मानवी हक्काचा भाग आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विधानसभेत सादर केलेले नवीन ‘महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना (नियमन) विधेयक’ केवळ नोंदणी आणि नियंत्रणापुरते मर्यादित न राहता, ते पूर्णपणे रुग्णकेंद्रित, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख असावे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे.
संस्थेचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब सिताराम औटी यांनी या प्रस्तावित कायद्यात अनेक सुधारणांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. जुन्या १९४९ च्या कायद्याच्या जागी येत असलेल्या या नवीन कायद्यात रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण आणि रुग्णालयांची जबाबदारी निश्चित करण्यावर भर दिला जावा, असे त्यांनी म्हटले आहे.प्रमुख मागण्या आणि सूचना कायद्यात स्वतंत्र ‘रुग्ण हक्क सनद’ समाविष्ट करून रुग्णांना सन्मानपूर्वक उपचार, माहिती मिळवण्याचा अधिकार, दुसऱ्या तज्ज्ञाचे मत वैद्यकीय नोंदी आणि उपचाराच्या खर्चाची पारदर्शकता मिळावी. आरोग्य विभागाच्या नियंत्रणापासून कार्यात्मकदृष्ट्या स्वतंत्र ‘महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना नियामक प्राधिकरण’ स्थापन करावे, ज्यामध्ये न्यायिक, वैद्यकीय, आरोग्य तज्ज्ञांसह ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा. राज्य, जिल्हा आणि स्थानिक स्तरावर ग्राहक संघटना, विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागासह स्वतंत्र तक्रार निवारण समित्या असाव्यात. उपचारापूर्वी अंदाजे खर्चाची लेखी माहिती देणे आणि प्रत्येक रुग्णालयाने दरपत्रक सार्वजनिक करणे बंधनकारक करावे. तसेच, मनमानी शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरीय शुल्क नियमन यंत्रणा असावी.आपत्कालीन स्थितीत उपचार नाकारणे हा गंभीर गुन्हा मानून त्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी. उपचारांना प्रथम प्राधान्य दिले जावे.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखतानाच, दोन्ही बाजूंना न्याय मिळण्यासाठी वस्तुनिष्ठ चौकशी करणारी स्वतंत्र समिती असावी, असेही मत मांडण्यात आले आहे. ग्राहकांना न्याय देणारा, वैद्यकीय व्यवसायावरील विश्वास वाढविणारा आणि उत्तरदायी आरोग्य व्यवस्था निर्माण करणारा हा कायदा असावा, अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीने व्यक्त केली आहे.
“रुग्ण सुरक्षित, ग्राहक सशक्त आणि आरोग्य व्यवस्था उत्तरदायी” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकारने या विधेयकात सकारात्मक बदल करावेत, असे आवाहन बाळासाहेब औटी यांनी केले आहे.
