पारनेर | ता. प्रतिनिधी, 
 
 पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार काशिनाथ दाते सरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणखी एक यश मिळाले असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेअंतर्गत पारनेर आगाराला मिळालेल्या पाच अत्याधुनिक एसटी बसेसचे लोकार्पण आज आमदार दाते सरांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी बोलताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले, “पारनेर आगाराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे यापूर्वीही अनेक नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. आता ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच अत्याधुनिक बसेस पारनेरच्या सेवेत दाखल झाल्याने प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा लाभ मिळणार आहे. कालच नव्याने रुजू झालेले डेपो व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी पारनेर आगारासाठी पाच नवीन बसेस मंजूर झाल्याची माहिती दिली. आवश्यक चालक पाठविल्यानंतर रात्री उशिरा या बसेस पारनेर आगारात दाखल झाल्या आणि आज नागरिक, महायुतीचे पदाधिकारी तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहक यांच्या उपस्थितीत या बसेसचे लोकार्पण करण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पारनेर तालुक्यातील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, भविष्यातही पारनेर आगाराला आवश्यक त्या सर्व सुविधा आणि नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, ज्येष्ठ पत्रकार संजय वाघमारे, शंकरराव नगरे, दत्ता नाना पवार, नगरसेवक अशोक चेडे, पै. युवराज पठारे, तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, शहरप्रमुख कविता औटी, नवनाथ सोबले, कांतीलाल ठाणगे, शहराध्यक्ष राजेंद्र औटी, संदीपराव रोहोकले, अपर्णा खामकर, लहु भालेकर, विठ्ठल कावरे, माऊली औटी, रामदास दाते, कंट्रोलर कुसकर यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार काशिनाथ दाते यांच्या पुढाकारामुळे पारनेर आगाराला मिळालेल्या या पाच ‘राजमाता जिजाऊ’ अत्याधुनिक बसेसमुळे तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार असून, प्रवाशांसह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

◼️ “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गेल्या काही वर्षांत प्रवाशांना अधिक दर्जेदार व आधुनिक सेवा देण्याच्या दिशेने सकारात्मक बदल करत असून, ‘राजमाता जिजाऊ’ ही अत्याधुनिक बससेवा त्याचे उत्तम उदाहरण आहे. आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पारनेर आगाराला पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. या बसेसमधील अधिक आसनक्षमतेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यातही अशाच आधुनिक सुविधा आणि अधिकाधिक नवीन बसेस पारनेर आगाराला उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आहे.”

  – ज्येष्ठ पत्रकार संजय वाघमारे

◼️ “आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पारनेर आगाराला ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच अत्याधुनिक एसटी बसेस मिळाल्या, ही पारनेर तालुक्यासाठी आनंदाची बाब आहे. या बसेसमुळे विशेषतः महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे. जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी आमदार दाते सर सातत्याने करत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.”

  – सौ. सुषमा रावडे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version