सुनिताताई सोबले यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक महिलांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर नगरपंचायत हद्दीतील सोबलेवाडी परिसरातील विविध प्रलंबित नागरी समस्यांबाबत संतप्त झालेल्या महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नगरपंचायत कार्यालयावर धडक देत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका शिंदे यांना घेराव घातला. यावेळी ५० हून अधिक महिला नगरपंचायत कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी सुनीताताई सोबले यांनी सांगितले की, बीएसएनएल कार्यालय ते विधाटे वस्ती या रस्त्यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही संबंधित काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईड पट्ट्या करण्यात आलेल्या नाहीत. तसेच आवश्यक खडीकरण आणि डांबरीकरणही दर्जाहीन पद्धतीने करण्यात आल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि रस्ता नव्याने दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, पुढील दोन महिन्यांत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर महिला मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन करून नगरपंचायत कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महिलांनी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा होत असून पाणी व्यवस्थापनाचे कोणतेही प्रभावी नियोजन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार करण्यात आली.
शहरातील वाढती अस्वच्छता हा देखील प्रमुख मुद्दा महिलांनी उपस्थित केला. मटन मार्केट परिसरातील काही दुकानदार सागर भजनी मंडळाच्या पाठीमागील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरते. या मार्गावरून अनेक नागरिक व प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले.
महिला प्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका शिंदे यांच्यासमोर आपल्या विविध समस्यांचा पाढा वाचत नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट केले. सर्व प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करणारे निवेदनही यावेळी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांच्यासह बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब सोबले, नाना शेरकर, शांताराम शेळके, अशोक शेरकर, सारिका सोनवणे, अनिता शेरकर, इंदुबाई शेरकर, सविता शेरकर, उज्वला शेरकर, सुषमा शेरकर, शांताबाई शेरकर, सुनिता शेरकर, जयश्री शेरकर, सुमनबाई पुंडे, कविता वैद्य, स्वाती वैद्य, छाया वैद्य, शोभा वैद्य, सुरेखा वैद्य, अंजली वैद्य, वृषाली वैद्य, सिंधू वैद्य, नीलम वैद्य, सुनिता विधाटे, उज्वला म. विधाटे, उज्वला ग. विधाटे, लता विधाटे, कविता विधाटे, मंगल विधाटे, स्वाती विधाटे, कमल विधाटे, कांता विधाटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.
🔶🔶🔶🔶🔶🔶
बीएसएनएल ऑफिस ते विधाटे वस्ती रस्त्याचे निकृष्ट काम, दूषित पाणीपुरवठा आणि शहरातील अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नगरपंचायतीने केवळ आश्वासने न देता तातडीने ठोस कारवाई करावी. पुढील दोन महिन्यांत प्रश्न निकाली न काढल्यास महिला भगिनींसह तीव्र धरणे आंदोलन आणि चक्काजाम करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही.
– सुनिताताई सोबले (सामाजिक कार्यकर्त्या)
