श्री ढोकेश्वर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कर्जुले हरिया येथे उत्साहात उद्घाटन....
टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर कर्जुले हरिया येथे पार पडत आहे. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री मारक साहेब, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप कुलसचिव डॉ. अजय ठुबे ,अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य सदस्य डॉ. भाऊसाहेब खिलारी, हरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक श्री शिवाजी शिर्के, सरपंच सौ संगीताताई मुळे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लक्ष्मणराव मतकर, उपप्राचार्य प्रा. वीरेंद्र धनशेट्टी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी बोलताना श्री मारक साहेब यांनी शिबिरातून विद्यार्थ्यांनी अनुभव घेऊन व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा तसेच उद्योग व व्यवसाय करून स्वतःच्या पायांवर उभे रहावे असे आवाहन केले तर डॉ.अजय दुबे यांनी शिबिराच्या नेटकेपणाने केलेल्या नियोजनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसराचा विकास करण्यासाठी हातभार लावावा असे मत व्यक्त केले.
आपल्या स्वागतपर मनोगतात श्री शिवाजी शिर्के व सरपंच संगीता ताई मुळे यांनी ग्रामस्थ व देवस्थानकडून शिबिरास सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी दिली तसेच विद्यार्थ्यांनी गावाचा सर्वे करून गावच्या विकासात भर घालण्यासाठी काय करता येईल याबाबतचा अहवाल तयार करावा असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून विद्यार्थ्यांनी या शिबिरातून आपल्या कलागुणांचा विकास करून महाविद्यालयाचे नाव मोठे करावे असे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी शिबिरास शुभेच्छा देऊन या शिबिरामुळेच समाजात समता प्रस्थापित होण्यास हातभार लागला आहे असे प्रतिपादन केले. या उद्घाटनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन प्रमुख श्री सावकार काकडे व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण कोठावळे यांनी तर आभार प्रा. नामदेव वाल्हेकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक संकेत ठाणगे यांनी केले
