पारनेर / भगवान गायकवाड, 
    ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी-गवळी येथे मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनसेचे तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून आणि पुण्यातील सुप्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.

      भैरवनाथ मंदिर परिसरात आयोजित या शिबिराचे उद्घाटन मनसेचे पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला पिंपरी-गवळी व परिसरातील गावांमधून मोठा प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या समस्या आणि मोतीबिंदूचा त्रास ग्रामीण भागातील वयोवृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आर्थिक परिस्थिती किंवा माहितीचा अभाव यामुळे अनेकजण उपचारांपासून वंचित राहतात. हीच बाब लक्षात घेऊन विरेंद्र थोरात यांनी या शिबिराचे नियोजन केले होते. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली असून, ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

अविनाश पवार यावेळी बोलताना म्हणाले की, “राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे ब्रीद समोर ठेवून आम्ही काम करत आहोत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी मनसे कटिबद्ध आहे. पारनेर तालुक्यात अशा प्रकारची आरोग्य शिबिरे आगामी काळातही ठिकठिकाणी राबविली जातील.”

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विरेंद्र थोरात यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी बबन थोरात, बाबासाहेब थोरात, विश्वनाथ मांडगे, मंगल थोरात, संजना थोरात, रंजना मांडगे, नामदेव वर्पे, शिला वर्पे, रविंद्र बांदल, अनिल मांडगे, बाळासाहेब चहाळ, चंद्रकांत तांगड, विकास थोरात, दादा चहाळ यांच्यासह पिंपरी-गवळी येथील ग्रामस्थ आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिरामुळे अनेक गरजू वृद्धांना दृष्टी मिळण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी मनसेच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version