टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी, 

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली. यानंतर विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. योग प्रशिक्षकांनी नियमित योगाभ्यासाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. तसेच तणावमुक्त जीवनासाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ. लक्ष्मणराव मतकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात योग ही भारताची प्राचीन परंपरा असून निरोगी जीवनासाठी योगाचा अंगीकार करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS), क्रीडा विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वीरेंद्र धनशेट्टी यांनी केले तर आभार एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय सुरोशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *