पारनेर / ता. प्रतिनिधी  
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विधान भवन, मुंबई येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सरांनी शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा ठामपणे मांडत कांद्याला अनुदान देण्याची जोरदार मागणी केली.

उपमुख्यमंत्री ना. श्रीम. सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे, ना. छगन भुजबळ, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार तसेच कृषी, पणन व वित्त विभागाचे प्रधान सचिव या बैठकीस उपस्थित होते.

पारनेर मतदारसंघासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत कमी बाजारभावामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी विविध आंदोलनांद्वारे आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. या सर्व आंदोलनांची दखल घेत आणि शेतकरी हिताला प्राधान्य देत आमदार काशिनाथ दाते सरांनी बैठकीत ठाम भूमिका मांडली.



या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी, पणन व वित्त विभागाच्या प्रधान सचिवांची अभ्यास समिती स्थापन करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन अनुदान मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीत आमदार काशिनाथ दाते सरांनी शेतकऱ्यांच्या भावना प्रभावीपणे मांडत त्यांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने लढा देण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 कांद्याला किमान ५ रुपये प्रति किलो अनुदान देऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादनखर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत आवश्यक आहे, मुंबई विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सकारात्मक विचार करुन शेतकरी हिताचे निर्णय होईल.

 – आ. काशिनाथ दाते सर 
(विधानसभा सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version