पारनेर / भगवान गायकवाड,
तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या पारनेर ग्रामीण रुग्णालयातील पाण्याची गंभीर समस्या अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे सुटली आहे. कूपनलिकेची मोटार नादुरुस्त झाल्याने निर्माण झालेल्या या टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीं काशीनाथ दाते सर,, सावित्री फातिमा सदभावना मंचचे कार्याध्यक्ष डॉ रफिक सय्यद आणि पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.
पारनेर ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील आरोग्यसेवेचे मुख्य केंद्र आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील कूपनलिकेची (बोअरवेल) मोटार अचानक नादुरुस्त झाली. यामुळे रुग्णालयाचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. रुग्णालयातील स्वच्छतेपासून ते रुग्णांच्या दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्याअभावी प्रशासनाची मोठी ओढाताण होत होती. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, ही बाब अत्यंत गंभीर बनली होती.
रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मृणाली पाटील यांनी या समस्येला दुजोरा दिला होता. ही बाब स्थानिक ग्रामस्थ भगवान गायकवाड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. गायकवाड यांनी या प्रश्नी आमदार काशीनाथ दाते (सर) यांना फोन करून परिस्थितीचे गांभीर्य मांडले. आमदार दाते यांनी तातडीने दखल घेत रुग्णालय प्रशासनाला शासकीय पातळीवर तांत्रिक दुरुस्तीचे आदेश दिले.
मात्र, तांत्रिक काम पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने तोपर्यंत रुग्णांची होणारी हेळसांड थांबवणे गरजेचे होते. रुग्णालयातील हौद रिकामे असल्याने डॉक्टरांनाही रुग्णांना उपचार देताना मर्यादा येत होत्या.रुग्णांची ही गैरसोय पाहून भगवान गायकवाड यांनी पारनेर शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ‘सावित्री फातिमा सद्भावना मंच’चे कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद यांच्याशी संपर्क साधला. डॉ. सय्यद यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न लावता स्वखर्चाने १०,००० लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिला.
याचबरोबर, पारनेर नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांनीही सामाजिक भावनेतून ५,००० लिटर पाण्याचा टँकर तातडीने रुग्णालयात पाठवून दिला. या मदतीमुळे रुग्णालयातील पाण्याचे साठवण हौद भरले गेले आणि रुग्णांचा पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला.
वेळेवर पाणी उपलब्ध झाल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न सुटला असून रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. कठीण प्रसंगात शासकीय निधीची वाट न पाहता, सामाजिक भावनेतून धावून येणाऱ्या आमदार काशीनाथ दाते (सर), डॉ. रफिक सय्यद, नगरसेवक योगेश मते , भगवान गायकवाड यांचे रुग्णालय प्रशासन आणि नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“रुग्णांची सेवा हेच आमचे कर्तव्य आहे. पाण्याअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे समजताच आम्ही तातडीने मदतीचा निर्णय घेतला. भविष्यातही अशा कामांसाठी आमचा मंच सदैव तत्पर राहील
— डॉ. रफिक सय्यद (कार्याध्यक्ष, सावित्री फातिमा सद्भावना मंच, पारनेर.
