नाईट पेट्रोलिंगमुळे २५ बेवारस बालकांना दिला सुखरूप निवारा…
अहिल्यानगर : शहरातील माळीवाडा, तारकपूर, पुणे बसस्थानक, रेल्वे स्टेशन, एमआयडीसी, केडगांव, नेप्ती नाका, भिंगार अशा संवेदनशील भागांमध्ये दररोज रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत नाईट पेट्रोलिंग करत स्नेहालय संस्थेच्या मुक्ती वाहिनी प्रकल्पाने गेल्या नऊ महिन्यांत २५ बेवारस बालकांना सुरक्षित निवारा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
मुक्ती वाहिनी प्रकल्पाचे स्वयंसेवक गेल्या एक वर्षापासून शहरात अविरत नाईट पेट्रोलिंग करत असून, या दरम्यान एखादे लहान मूल एकटे फिरताना, असुरक्षित अवस्थेत आढळल्यास त्याच्याशी संवाद साधून तातडीने बाल कल्याण समितीची परवानगी घेऊन पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली जाते. यापूर्वी स्नेहालय संस्थेच्या चाईल्ड लाईन प्रकल्पामार्फत मागील १५ वर्षे हे काम सुरू होते. मात्र चाईल्ड लाईनचे शासनात विलिनीकरण झाल्यानंतर हा उपक्रम काही काळ बंद झाला होता. या कालावधीत बालकांशी संबंधित समस्यांमध्ये वाढ झाल्याने स्नेहालय संस्थेने मुक्ती वाहिनी प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा नाईट पेट्रोलिंग सुरू केले.
दररोज रात्री अकरा वाजता मुक्ती वाहिनीचे दोन स्वयंसेवक दुचाकीवरून शहरात नाईट पेट्रोलिंगसाठी निघतात. सार्वजनिक ठिकाणी लहान मुले एकटी बसलेली दिसल्यास किंवा एखादी व्यक्ती मुलांसोबत संशयास्पद वर्तन करत असल्यास स्वयंसेवक तातडीने हस्तक्षेप करतात. पोलिस प्रशासनालाही या उपक्रमाची माहिती असल्याने, रात्री लहान मुलांशी संबंधित घटना घडल्यास पोलिसांकडूनही स्वयंसेवकांना त्वरित कळविण्यात येते.
असाच एक प्रकार अलीकडे घडला. रात्री ११ ते १२ च्या सुमारास एक ९ वर्षीय बालक बेवारस अवस्थेत शहरात फिरताना आढळून आला. मुक्ती वाहिनीच्या स्वयंसेवकांनी तत्काळ हस्तक्षेप करत बालकाला गांधी मैदान येथील मुक्ती वाहिनी कार्यालयात सुरक्षित आणले व याबाबत प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांना माहिती दिली.
त्यानंतर रात्रीच्या विभागातील स्वयंसेवक रवी फुलमाळी यांच्या माध्यमातून बालकाला कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस व मुक्ती वाहिनीच्या संयुक्त शोध मोहिमेत माळीवाडा परिसरात बालकाचे वडील सापडले; मात्र ते पूर्णतः दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत होते व बालकाची जबाबदारी घेण्यास असमर्थ होते. तसेच ते अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी नसल्याचेही स्पष्ट झाले.
बालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते संभाजीनगर येथून मागील आठ दिवसांपासून येथे आले असून वडील सतत दारू पिऊन पडून राहतात आणि आपण रात्रभर इकडे-तिकडे फिरत असल्याचे त्याने सांगितले. बालकाच्या सुरक्षिततेचा विचार करता तातडीने त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्याला शासकीय बालगृहात सुखरूप निवारा देण्यात आला.
नगर शहरात २४ तास सक्रिय असलेल्या स्नेहालय संचलित मुक्ती वाहिनी प्रकल्पाने गेल्या नऊ महिन्यांत बेवारस अवस्थेत सापडलेली तसेच हरवलेली व अत्याचारपीडित अशा एकूण २५ बालकांना सुरक्षित निवारा व पुनर्वसनाची दिशा दिली आहे.
बालकांच्या शोधासाठी आणि संरक्षणासाठी नाईट पेट्रोलिंगचा उपक्रम अविरतपणे राबविणारे स्नेहालय संस्थेचे मुक्ती वाहिनी हे देशातील पहिले युनिट असून, त्यांच्या संवेदनशील व तत्पर कार्यामुळे अनेक निष्पाप बालकांचे जीवन व भविष्य सुरक्षित होत आहे.
