पारनेर / भगवान गायकवाड,
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत असणाऱ्या पारनेर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींच्या शासकीय वसतिगृहात रमीज राजे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी ३० विद्यार्थिनींना प्रत्येकी एक डझनप्रमाणे ३० डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मिडियाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार विनोद गायकवाड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पारनेर शहराध्यक्ष पत्रकार भगवानराव गायकवाड, दैनिक आधुनिक केसरीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार श्रीनिवास शिंदे, योग शिक्षिका मीरा पुजारी, वसतिगृह अधीक्षक करुणा ढवणे, अमीन सय्यद, आशा उदावंत, छाया सोनुळे, कोमल औटी, दीपाली घागुर्डे, जनाबाई भिटे तसेच वसतिगृहातील विद्यार्थिनी व मान्यवर उपस्थित होते.
योग शिक्षिका मीरा पुजारी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे हा रमीज राजे सामाजिक प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत करण्याची भावना प्रत्येकात असावी. या मदतीमुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.” वसतिगृह अधीक्षक करुणा ढवणे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले, “शैक्षणिक साहित्य वाटपामुळे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागतो.”
रमीज राजे हे पारनेर शहरातील एक यशस्वी उद्योजक आणि निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या “रमीज राजे सामाजिक प्रतिष्ठान” च्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात अग्रणी भूमिका बजावतात. समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि गरजू घटकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांत मदत करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागला. तसेच रमीज राजे यांचे प्रतिष्ठान वर्षभरात अनेकदा रक्तदान शिबिरांचे आयोजन करते. या शिबिरांमुळे समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण होऊन अनेकांना जीवदान मिळते. रक्तदानाच्या या उपक्रमांना स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतो.
रमीज राजे यांचे प्रतिष्ठान शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजसेवेचा आदर्श ते घालून देतात.
रमीज राजे यांचे कार्य समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या रक्तदान शिबिरांसारख्या उपक्रमांनी समाजात सकारात्मक बदल घडवला असून, त्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भगवान गायकवाड यांनी केले, तर आभार श्रीनिवास शिंदे यांनी मानले.
