‘शेजारधर्म’ या विषयावर पारनेर येथे परिसंवाद संपन्न
पारनेर / भगवान गायकवाड,
‘शेजारधर्म पाळणे हे केवळ नैतिक कर्तव्य नाही, तर सुखी आणि सुरक्षित जीवनाचा पाया आहे,’ असे प्रतिपादन डॉ.रफिक सय्यद यांनी केले ते पारनेर शहरातील दर्गा मस्जिद येथे आयोजित शेजारधर्म परिसंवाद कार्यक्रमात केले.या परिसंवादच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प सोपानकाका औटी होते. प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा डॉ विद्या कावरे, माजी नगराध्यक्ष विजय औटी,ह.भ.प अशोक महाराज शिंदे, ह.भ.प रभाजी औटी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी,किसान परिवाराचे चंद्रकांत चेडे, गौरव उद्योग समूहाचे अर्जुन भालेकर, नगरसेवक युवराज पठारे, किसन गंधाडे, डॉ.मुद्दसर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सय्यद यांनी शेजारधर्म या विषयावर विचार व्यक्त केले त्यांनी शेजारधर्माची महती स्पष्ट केली. ते म्हणाले, “एक काळ असा होता, जेव्हा कुटुंबाचा एक भाग म्हणून शेजाऱ्यांकडे पाहिले जायचे. सुख-दुःखात, अडचणीत आणि आनंदाच्या क्षणी शेजारी सर्वप्रथम मदतीला धावून येतात. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मानवी संबंधांची वीण काहीशी सैल होत आहे, अशा वेळी शेजारधर्म ही संकल्पना आपल्याला पुन्हा एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.” त्यांनी पुढे सांगितले की, शेजाऱ्यांमध्ये असलेला विश्वास आणि सलोखा हा कोणत्याही सोसायटीच्या किंवा वस्तीच्या सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. एक चांगला शेजारच व्यक्तीला मानसिक शांतता आणि आधार देतो. शेजारधर्म हे एक अदृश्य सुरक्षा कवच आहे, जे लोकांना भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या जोडलेले ठेवते.” या वेळी विजय औटी,चंद्रकांत चेडे, युवराज पठारे,अर्जुन भालेकर, अशोक शिंदे, शगुप्ता शेख, सरस्वती जावळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
ह भ प अशोक शिंदे त्यांनी बोलताना सांगितले की, जुन्या काळात शेजाऱ्यांमध्ये इतका आपुलकीचा व्यवहार होता की, घराला कुलूप लावण्याचीही गरज वाटत नसे. आज काळ बदलला असला तरी, माणुसकी आणि विश्वासाची गरज तशीच आहे.” त्यांनी तरुणांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या शेजाऱ्यांशी संवाद साधावा आणि जुने नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करावा. शेजाऱ्यांनी एकमेकांवर लक्ष ठेवल्यास घरफोडी आणि इतर गुन्हेगारी घटनांना आळा बसतो. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत शेजारी सर्वात आधी पोहोचून मोठी मदत करू शकतात. सण-समारंभात एकत्र आल्याने सामाजिक सलोखा वाढतो. पारनेर येथील नागरिकांनी या परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक नागरिकांनी संयोजकांचे आभार मानले.
सूत्रसंचालन राजु करंदीकर यांनी केले तर आभार भाऊसाहेब औटी यांनी मानले.
