“शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार निलेश लंके पवार साहेबांशीच एकनिष्ठ; जिल्हा प्रवक्ते मोहन रोकडे यांचा ठाम दावा”
दिव्य जनलोक I श्रीनिवास शिंदे,
अहिल्यानगरचे खासदार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या कथित पक्षांतराच्या चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मोहन रोकडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “खासदार निलेश लंके कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत जाणार नाहीत. ते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून पवार घराण्याशी एकनिष्ठ राहतील.”
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात निलेश लंके यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या पूर्वीच्या शिवसेना पार्श्वभूमीमुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली होती. मात्र, या सर्व अफवा असल्याचे सांगत मोहन रोकडे यांनी त्यांचे स्पष्ट खंडन केले.
रोकडे म्हणाले, “लोकनेते खासदार निलेश लंके हे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विश्वासू आणि खंबीर नेते आहेत. लोकसभेची निवडणूक त्यांनी पवार साहेबांच्या विश्वासावर लढवली आणि जनतेने त्यांना भरघोस पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षांतराचा प्रश्नच उद्भवत नाही.”
सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या निलेश लंके यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. तालुका प्रमुख म्हणून काम केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये पारनेर मतदारसंघातून आमदार आणि २०२४ मध्ये अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजय मिळवत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. विकासकामे, जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांमुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक पक्षांकडून नेत्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी “निलेश लंके हे पवार साहेबांच्या विचारांशी बांधील आहेत. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे,” असे आवाहनही मोहन रोकडे यांनी केले.
या स्पष्ट भूमिकेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटातील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, लंके यांच्या एकनिष्ठेचे स्वागत करण्यात येत आहे.
