पारनेर / भगवान गायकवाड,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या पारनेर बसस्थानकावरील एस टी कॅन्टीन येथे आज, दि. १६ रोजी, ‘चहा दिन’ मोठ्या उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी एस टी कॅन्टीनचे संचालक वसीम राजे, बाळासाहेब शेटे, भगवान नगरे,साहिल शेख, भैया मोमिन,कुणाल गायकवाड, आदी उपस्थित होते.
एकमेकांचे स्नेह संबंध अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने हा अनोखा दिवस साजरा करण्यात आला. एस टी कॅन्टीन हे बसस्थानकावर प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना अल्पोपाहार पुरवणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे, आणि याच ठिकाणी हा ‘चहा दिन’ सर्वांना एकत्र आणणारा ठरला.
यावेळी बसस्थानकावरील अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक तसेच कॅन्टीनमधील कर्मचारी चहाचा स्वाद घेत असतात.चहाच्या कपाने एकमेकांना शुभेच्छा देत, मनमोकळ्या गप्पा मारत आणि सुख-दुःखाची देवाणघेवाण करत हा दिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमधील एकोपा आणि जिव्हाळा वाढण्यास मदत झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या आगळ्यावेगळ्या ‘चहा दिना’च्या माध्यमातून एसटी कॅन्टीनने केवळ चहाचा व्यवसाय न करता, सामाजिक आणि भावनिक ऋणानुबंध जपण्याचा संदेश दिला आहे.
