पारनेर / ता. प्रतिनिधी,  
पाबळ ता. पारनेर येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले नायब सुबेदार संतोष (अमोल) देवराम गोर्डे यांना उत्कृष्ट कामगिरी व देशाप्रती निःस्वार्थ सेवेसाठी भारतीय लष्करप्रमुखांकडून प्रदान करण्यात येणाऱ्या “The Chief of the Army Staff Commendation Card” या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. या सन्मानाची घोषणा २२ मे २०२६ रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आली.

भारतीय सैन्याच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अवघ्या ८६ सैनिकांमध्ये नायब सुबेदार संतोष गोर्डे यांची निवड होणे ही पाबळसह संपूर्ण पारनेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

नौदलात उत्कृष्ट सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले मेजर देवराम गोर्डे यांचे सुपुत्र संतोष गोर्डे यांनीही देशसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेत भारतीय सैन्यात आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची नायब सुबेदार पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि देशभक्तीची साक्ष देणारा आहे. सध्या ते नवी दिल्ली येथील सैन्य मुख्यालयाच्या विदेश विभागात कार्यरत असून देशहिताच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. कापसे सर, शिवराज कदम, विश्वनाथ कवडे सर, पांडूरंग कवडे सर, डॉ. भास्करराव शिरोळे, डॉ. सुरेश उचाळे, संतोष कापसे, राजेंद्र कवडे, कैलास कवडे, नाथा कापसे, भरत गोर्डे, भाऊसाहेब गोर्डे, पोपट महाराज गोर्डे, पोपट महाराज कापसे, म्हातारबा महाराज गोर्डे, शिवराम कापसे, लक्ष्मण मामा गोर्डे, मेजर देवराम गोर्डे, बाळासाहेब दरेकर, ज्ञानदेव गोर्डे, मच्छिंद्र दरेकर, बन्शी कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नायब सुबेदार संतोष (अमोल) गोर्डे यांच्या या यशामुळे पाबळ परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

▪️ “पाबळच्या सुपुत्राने भारतीय सैन्यात केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि मिळविलेला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान हा संपूर्ण पारनेर तालुक्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. नायब सुबेदार संतोष गोर्डे यांनी आपल्या कर्तृत्वाने युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. देशसेवेसाठी समर्पित असलेल्या अशा जवानांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.”

– आमदार काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version