स्नेहालय संचलित ‘मुक्ती वाहिनी’ प्रकल्पाचा पहिला वर्धापन दिन उत्साहात… 

अहिल्यानगर | भगवान गायकवाड, 
“मुक्ती वाहिनी प्रकल्पामुळे बालसंरक्षणाला नवी दिशा मिळाली असून, विशेषतः बालविवाह रोखण्यात या उपक्रमाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे,” असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद अहिल्यानगर रवींद्र देसले यांनी केले. स्नेहालय संचलित ‘मुक्ती वाहिनी’ प्रकल्पाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हनिफ शेख यांनी प्रस्तावना करत स्नेहालय संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. त्यांनी सांगितले की, १९९० साली सुरू झालेल्या ‘मुक्ती वाहिनी’ चळवळीने पुढे चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ही सेवा स्नेहालयने तब्बल २० वर्षे यशस्वीपणे चालवली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात निर्माण होणाऱ्या नव्या समस्यांना समोर ठेवून ‘मुक्ती वाहिनी’ प्रकल्प नव्या स्वरूपात सुरू करण्यात आला असून, पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या प्रवासाचा अनुभव त्यांनी मांडला. तसेच उडान, बालभवन, स्नेह बाल आधार आदी स्नेहालयच्या विविध प्रकल्पांची माहितीही त्यांनी दिली.

प्रमुख पाहुणे प्रशांत गायकवाड (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) यांनी महिला व बालविकास विभाग व ‘मुक्ती वाहिनी’च्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. चंद्रकांत खाडे (विस्तार अधिकारी) यांनी स्नेहालयच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात पत्रकार महेश पठारे यांचा उत्कृष्ट सामाजिक भान जपणाऱ्या पत्रकार म्हणून मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविण्याची जबाबदारी अधोरेखित करत. स्नेहालय संस्थेसोबत मागील 17 वर्षापासून आलेला अनुभव यावेळी पठारे यांनी व्यक्त केला.

या वेळी प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी ‘मुक्ती वाहिनी’ प्रकल्पाचा वर्षभराचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, वर्षभरात बाल शोषण ४३, इमोशनल सपोर्ट २५, घरातून पळून आलेल्या २८ बालकांना मदत, ४ निवारा, ३१ शैक्षणिक मदत, ११ भीक मागणाऱ्या बालकांची सुटका, २६ हरवलेले बालक शोध, २० शासकीय योजना लाभ, ५ वैद्यकीय मदत आणि ८३ बालविवाह रोखण्यात यश मिळाले असून, एकूण २७६ बालकांना संकटातून मुक्त करून सुरक्षित जीवनाची दिशा देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा वाघ यांनी केले. शेवटी मानद संचालक ॲड बागेश्री जरंडीकर मुक्ती वाहिनी टीम ही २४ तास आणि 7 दिवस काम करत जिल्ह्यातील प्रत्येक बालका न्याय मिळून दिला यांसाठी मुक्ती वाहिनी प्रकल्पातील कार्यकर्ता यांचे कौतुक करत आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवर, अधिकारी व उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला संचालक प्रवीण मुत्याल, गणेश झुगे, स्नेहालय संस्थेचे फोटो व्यवस्थापक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच उडान व मुक्ती वाहिनी टीम, बालमित्र आणि पथनाट्य पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा जुनी, कुणाल कदम, निशा वाघ, महेश शिंदे, भगवान गायकवाड, प्रतीक्षा वाघ, नेहा धिवरे, कल्याणी भोसले आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचा समारोप बालमित्रांच्या हस्ते केक कापून आनंददायी वातावरणात करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version