पारनेर / भगवान गायकवाड,
तालुक्यातील चिंचोली येथील जि. प. प्राथ. शाळेने शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर ग्रामस्थांचे मन जिंकले असून, याची प्रचिती प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आली. शिक्षकांच्या मेहनतीला दाद म्हणून ग्रामस्थांनी शाळेला रोख रुपयांचे शैक्षणिक साहित्य व वस्तू स्वरूपात भरघोस मदत केली आहे. लोकसहभागाच्या या अनोख्या मॉडेलचे तालुक्यात कौतुक होत आहे.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपसरपंच सौ. ज्योती सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.
यावेळी आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगेश झंजाड हे होते. मुख्याध्यापिका सौ. सरिता औटी यांनी प्रास्ताविकातून शाळेची प्रगती आणि गरजा मांडल्या, ज्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मदतीचा ओघ आणि भेटवस्तूंची यादी पुढीलप्रमाणे सरपंच योगेश झंजाड विद्यार्थ्यांसाठी जर्किन, स्पोर्ट्स ड्रेस, २ टेबल, ३ खुर्च्या, १ सिलिंग फॅन, गॅस शेगडी, कुकर आणि पोषण आहार शिजवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य.माजी सरपंच सौ. वैशाली सतीश पिंपरकर इयत्ता चौथीच्या ५ विद्यार्थिनींना शाळेत येण्या-जाण्यासाठी सायकली भेट दिल्या. विविध कार्यकारी सोसायटी शाळेच्या सुरक्षिततेसाठी ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले.
जयवंत लवांडे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर भेट दिला. याचे प्लंबिंग काम सुहास झंजाड यांनी स्वखर्चाने करून दिले. शाळा व्यवस्थापन समिती जयदीप पिंपरकर, प्रदीप पिंपरकर, निलेश झंजाड शाळेला मोठे ‘गोदरेज’ कपाट भेट दिले. सतीश पिंपरकर संचालक, खरेदी-विक्री संघ,शाळेच्या दर्शनी भागाचे रंगकाम आणि आकर्षक नामफलकाचा खर्च उचलला.
रामलिंग पतसंस्थेकडून टेबल, रवींद्र पिंपरकर यांच्याकडून स्पीकर माईक सेट, तर बौद्ध महासभेच्या वतीने शालेय साहित्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट देण्यात आली.
शाळेतील शिक्षक किसन दुधाडे आणि सौ. सरिता औटी यांनी राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली आहे. याच विश्वासातून ग्रामस्थांनी शाळेच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. विस्तार अधिकारी देवराम पिंपरकर यांचेही या प्रक्रियेत मोलाचे सहकार्य लाभले.
या सोहळ्याला सोसायटीचे चेअरमन जयदीप पिंपरकर, व्हाईस चेअरमन लहू सातपुते, बन्सी सातपुते, मंगेश मते, राजाराम पिंपरकर, वीरेंद्र लवांडे, निखिल लवांडे, आशिष मते, अमोल भगत, माधव पिंपरकर, योगेश चांदगुडे, दीपक सातपुते यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल पारनेरचे गटशिक्षणाधिकारी विनेश लाळगे, विस्तार अधिकारी जयश्री व्होरा आणि केंद्रप्रमुख नारायण बाचकर यांनी शाळेचे व ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे आभार किसन दुधाडे सर यांनी मानले.
