पारनेर / ता. प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप-कन्हेर येथे आमदार काशिनाथ दाते सरांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या तवली- ठाकरवस्ती ते दरेकर वस्ती रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन डॉ. प्रदीप दाते यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या रस्त्यासाठी १० लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सदर रस्ता पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस मोठी सोय होणार असून शेतकरी, विद्यार्थी तसेच कामानिमित्त ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी कमी होऊन गावकुसातील वस्तीपर्यंत सहज वाहतूक होणार असल्याने ग्रामस्थांनी या विकासकामाचे स्वागत करत आमदार दाते सरांचे आभार मानले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रदीप दाते म्हणाले की, शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेप्रती आमदार काशिनाथ दाते सरांना असलेली आत्मीयता आणि जिव्हाळा हा मतदारसंघाच्या विकासाचा खरा पाया आहे. जोपर्यंत सर मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत सामान्य माणसाला न्याय मिळत राहील याबाबत मला अजिबात शंका नाही.
ते पुढे म्हणाले की, आज संपूर्ण मतदारसंघात सुरू असलेल्या सर्वसमावेशक विकासकामांचा वेग हा सरांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या आपुलकीचे प्रतिक आहे. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही आमदार दाते सरांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज भासत नाही, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना न्याय मिळावा यासाठी आमदार दाते दर सोमवारी पारनेर येथे आणि शुक्रवारी नगर येथील संपर्क कार्यालयात दिवसभर नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहतात, असेही त्यांनी सांगितले. मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आशा घेऊन आलेला प्रत्येक नागरिक समाधानी होऊन परत जावा, हा त्यांचा कायमचा अट्टाहास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी रंगनाथ दाते, महादू शेठ आहेर, पोपट आहेर, सुखदेव आहेर, मारुती दरेकर, राजेंद्र भालके, संतोष जाधव, बबन दरेकर, सुभाष आहेर, चंदुशेठ दरेकर, प्रकाश रोहकले, अमोल दरेकर, दादू दरेकर, हरीभाऊ दाते, सुनील पवार, महेंद्र पवार, आदिनाथ रोहकले, महेंद्र रोहकले आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
