संगमनेर तालुक्यातील ५६८ अंगणवाडी सेविकांचा ‘बालविवाहमुक्त गाव’ करण्याचा निर्धार
संगमनेर / भगवान गायकवाड,
संगमनेर शहर येथे बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग तसेच जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प विभाग, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा बाल संरक्षण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन, स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि महिला सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यशाळेत संगमनेर तालुक्यातील एकूण ५६८ अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी गावपातळीवर प्रभावी जनजागृती करणे आणि बालविवाह रोखण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार यावेळी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेत स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्नेहालय संस्थेच्या विविध प्रकल्पांची माहिती देत बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, बालहक्क, बालविवाहामागील सामाजिक कारणे तसेच त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर व आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, कमी वयात विवाह झाल्यानंतर मोठ्या जबाबदाऱ्या पेलणे कठीण जाते आणि अनेक शारीरिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच गावपातळीवर जनजागृती करताना संवेदनशील भाषा, संवाद कौशल्य आणि समुपदेशनाची पद्धत यांचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जोखमीतील मुलींची ओळख पटविणे, कुटुंबांशी संवाद साधणे आणि बालविवाहाची शक्यता दिसताच संबंधित प्रशासनाला माहिती देणे याबाबतही त्यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविकांनी बालविवाह प्रतिबंधाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. प्रविण कदम यांनी त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींवरही मार्गदर्शन केले.
यानंतर महिला सक्षमीकरण केंद्राच्या दिपाली भोले यांनी बेटी बचाओ – बेटी पढाओ अभियानाबाबत मार्गदर्शन करत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तर चाईल्ड हेल्पलाईनचे सुपरवायझर राहुल वैराळ यांनी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या सेवेसंदर्भात सविस्तर माहिती देत संकटग्रस्त बालकांसाठी ही सेवा कशी उपयुक्त ठरते याविषयी मार्गदर्शन केले. जोखमीतील किंवा संकटात सापडलेल्या बालकांबाबत त्वरित १०९८ हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी साक्षी मानकर यांनी उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका व मान्यवरांना बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा दिली. गावागावात जनजागृती करून कोणत्याही परिस्थितीत बालविवाह होऊ देणार नाही, असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री निलेश राऊत, केंद्र समन्वयक ज्योती पवार, बाल संरक्षण अधिकारी जयश्री जाधव, सखी
वन स्टॉप सेंटर चे तृप्ती नेहे, अर्चना कातोरे आणि सर्व पर्यवेक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाल विकास प्रकल्प अधिकारी नीलेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अंगणवाडी सेविकांनी आभार मानले.
आपला नम्र
प्रविण कदम
प्रकल्प व्यवस्थापक
स्नेहालय उडान प्रकल्प
9011026495
8208307319
