पारनेर/प्रतिनिधी : 
 पारनेर तालुक्याच्या दक्षिण भागातील सोळा-सतरा गावांमधून वाहणारा कुकडी डावा कालवा या परिसरातील शेतीसाठी वरदान ठरला आहे. या कालव्यामुळे निघोज, अळकुटी परिसरातील गावांमध्ये बागायती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, कालव्यावर पूल आणि अन्य सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी 7 ते 8 किलोमीटरचा वळसा घ्यावा लागतो. पिंपळनेर, म्हसे, जवळा, नारायणगव्हाण, वडगाव गुंड आणि निघोज-अळकुटी परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी पारनेर तालुक्याचे नेते आणि कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुजित झावरे पाटील यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर केले. त्यांनी कालवा क्षेत्रातील सर्व गावांमध्ये आवश्यक ठिकाणी पूल बांधण्यासाठी जलसंपदा खात्यामार्फत स्वतंत्र बजेट तयार करण्याची मागणी केली. या निवेदनाची मंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने बैठक आयोजित करून सर्व पूलांच्या बांधकामाला मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मंत्र्यांच्या तत्परतेचे शेतकरी कौतुक करत आहेत. लवकरच पूल बांधणीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version