अहिल्यनगर / भगवान गायकवाड,
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे १२ वर्षीय शाळकरी मुलीवर ज्वलनशील पदार्थ फेकून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यातून संतापाची आणि सहानुभूतीची लाट उसळली आहे. या धक्कादायक घटनेची दखल सामाजिक संस्था, प्रशासन, शासन यंत्रणा तसेच विधी सेवा प्राधिकरण यांनी घेतली असून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विविध स्तरांवरून हात पुढे येत आहेत. या सर्व मदतीमध्ये सर्वात मोठा मानसिक आणि भविष्यासाठीचा आधार स्नेहालय संस्था – उडान प्रकल्प आणि मुक्ती वाहिनी टीमने दिला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्नेहालय उडान आणि मुक्ती वाहिनी टीमने तात्काळ लोणी प्रवरा येथील रुग्णालयात जाऊन मुलीची भेट घेतली. त्या वेळी तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्यामुळे सविस्तर संवाद साधता आला नाही. मात्र त्यानंतर टीमने मुलीच्या आई, मामा आणि कुटुंबीयांची घरी भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. बालकल्याण समितीच्या समुपदेशकांच्या माध्यमातून कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला.
या घटनेमुळे मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असून तिच्या आयुष्यावर मोठा मानसिक आघात झाला आहे. याची गंभीर दखल घेत स्नेहालय उडान प्रकल्पाने तिचे सातत्यपूर्ण समुपदेशन, पुढील शिक्षण, सुरक्षित निवारा आणि भविष्यासाठी संपूर्ण मदत करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिस प्रशासनाला मदत करणे, मुलीला न्याय मिळवून देणे आणि तिचे आयुष्य पुन्हा सुरळीत करण्यासाठी स्नेहालय संस्था पुढाकार घेत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल राज्यभरातून घेतली जात असून विधी सेवा प्राधिकरणामार्फत तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच लोणी प्रवरा येथील विखे रुग्णालयानेही मुलीवरचे उपचार पूर्णपणे मोफत करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्याकडून पीडित मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.
मुलीचे वडील चार वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईवर असून अत्यंत कठीण परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगत आहे. या पार्श्वभूमीवर स्नेहालय उडान प्रकल्प आणि मुक्ती वाहिनी टीमने केवळ तातडीची मदतच नव्हे तर तिच्या पुढील शिक्षण, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घकालीन साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
“ही घटना समाजाच्या संवेदनशीलतेवर झालेला आघात” – हनिफ शेख
या घटनेबाबत स्नेहालयचे संचालक तथा बाल कल्याण समितीचे माजी अध्यक्ष हनिफ शेख यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले,
“संगमनेर तालुक्यात घडलेली ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. एका निष्पाप १२ वर्षीय मुलीवर ज्वलनशील पदार्थ फेकून केलेला हल्ला हा केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेवर झालेला आघात आहे. अशा घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत आणि त्यांचा आपण सर्वांनी मिळून ठामपणे विरोध केला पाहिजे.”
ते पुढे म्हणाले की, स्नेहालय संस्थेला यापूर्वीही ॲसिड हल्ल्यातील महिलांच्या पुनर्वसनाचा अनुभव असून त्या अनुभवाच्या आधारे स्नेहालय या मुलीच्या पाठीशी केवळ तात्पुरत्या मदतीसाठी नव्हे तर तिच्या संपूर्ण आयुष्याच्या पुनर्बांधणीसाठी उभे आहे.
“स्नेहालयचा उडान प्रकल्प आणि मुक्ती वाहिनी टीम तिचे समुपदेशन, सुरक्षित निवारा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि कायदेशीर मदत यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत आहे. या मुलीचे व तिच्या कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन करण्याची हमी आम्ही देत आहोत. तिच्या आयुष्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण करणे आणि तिला स्वाभिमानाने उभे राहण्यास सक्षम करणे यासाठी आम्ही सातत्याने कार्य करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर समाजाने अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ज्वलनशील पदार्थांच्या विक्रीवर कडक नियंत्रण ठेवणे, मुलींच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे, संशयास्पद हालचालींची तात्काळ पोलिसांकडे माहिती देणे आणि शाळा-गाव पातळीवर संवेदनशीलता कार्यक्रम राबवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र या कठीण काळात स्नेहालय उडान आणि मुक्ती वाहिनी प्रकल्पांनी पीडित मुलीच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला असून तिच्या पाठीशी शेवटपर्यंत उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
