पारनेर : ता. प्रतिनिधी 

गुरुवार दि. २ एप्रिल २०२६,
नगर तालुक्यातील जखणगाव हे आरोग्यदायी गाव म्हणून राज्यातच नाही तर देशात सुप्रसिद्ध आहे. या गावांमध्ये ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांचे मार्फत गावातील अधिकृत हॉस्पिटल च्या सहकार्याने यंदाच्या नवीन आर्थिक वर्षापासून शिव आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथजी दाते सर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. जखणगाव मध्ये चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तन सेवेपश्चात आमदारा दातेंनी शिवआरोग्य योजना जखणगावकरांसाठी अधिकृतपणे सुरू झाल्याचे जाहीर केले. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेले पाच पायल्या धान्य किंवा फळे, भाजीपाला वार्षिक देणगी म्हणून जमा केल्यावर त्यांना वर्षभर सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा मोफत पुरवण्यात येतील. 

या योजनेची प्रस्तावना करताना गावचे सरपंच डॉ.सुनील गंधे यांनी या योजनेमार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्या,उपचार व औषधांचे नियोजन याबाबत सविस्तर माहिती सांगितली. गोळा झालेल्या या धान्याचा, भाजीपाला व फळांचा वापर या योजनेत सक्रिय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स व आरोग्यदुतांच्या कुटुंबाना वितरित करून सेंद्रिय खाद्यपदार्थांच्या वापरानेकिमान त्यांच्या कुटुंबातील आरोग्य व्यवस्था सुदृढ होईल. मोबदल्यात आरोग्य सेवा गावातील परिवारांना पुरवताना सेवाभावी कार्य म्हणून त्यांच्या हातून धर्मकार्य व पुण्य कार्य घडेल. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीप्रमाणे रुग्ण व डॉक्टर्स यांचे नाते व्यावहारिक न राहता जिव्हाळ्याचे निर्माण होईल. 

या कार्यक्रमास हरी भक्ती परायण योगेश महाराज शिंदे, उद्योजक बापूशेठ सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ वाळके, देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब कर्डिले, सौ. नंदाताई बबन कर्डिले, बचत गट प्रतिनिधी श्रीम. रंजनाताई गंधे, माजी सरपंच बबनराव कर्डिले, मनोहर काळे, निलेश भिसे, राजू काका कर्डिले, सुभाषराव सौदागर, भीमराज सौदागर, गोवर्धन गुंड, गणेश वाळके यांचे सह असंख्य जनसमुदाय उपस्थित होता. या योजनेत भाग घेणाऱ्या ग्रामस्थांना शिवा आरोग्य योजनेचे विशेष कार्ड यावेळी वाटण्यात आले. ते कार्ड दाखवल्यावर नेमून दिलेल्या हॉस्पिटल व ओपीडीमध्ये अशा गावकऱ्यांना एक रुपयाही भरावा लागणार नाही. रक्त तपासण्या, डिजिटल एक्स-रे, इसीजी व उपलब्ध औषधोपचार संपूर्णतः मोफत असून सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय, अंजीओग्राफी अशा तपासण्यांमध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे. तसेच मेडिकलच्या दुकानातून खरेदी कराव्या लागणाऱ्या औषधावर त्यांच्या किमतीत खास सूट देण्यात येणार आहे. भारतामध्ये प्रथमच हा प्रयोग गाव पातळीवर संपूर्ण आरोग्यग्राम या दृष्टीने राबविण्यात येत असून हा नक्कीच यशस्वी होईल व शासनाला पथदर्शी ठरेल असे मत जखणगांव उपकेंद्रातील आरोग्यसेवक भगवाने यांनी व्यक्त केले.आपल्या देशात आर्थिक वर्ष हे एक एप्रिल पासून सुरू होत असते कारण त्यापूर्वी रब्बी हंगामातील अन्नधान्याची शेतकऱ्यांकडे आवक झालेली असते. त्यामुळेच मार्चला पूर्वी घेतलेले कर्ज परतफेडीची अंतिम मुदत असते. हिंदू धर्म परंपरेप्रमाणे नवीन वर्ष सुद्धा चैत्र महिन्यापासून म्हणजेच याच काळात सुरु होते.याच पार्श्वभूमीवर यंदाच्या आर्थिक वर्षापासून ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाचा विचार करून सुरू करण्यात आली आहे. जे गावकऱ्यांना शेती नाही किंवा शेतीत पुरेसे धान्य झाले नाही अशांसाठी मानसी ५०० रुपये भरून यात सहभागी होता येईल.


🔶🔶🔶🔶🔶🔶
 शेती व शेतीपूरक धंद्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे ७० टक्के ग्रामस्थांचा वार्षिक उत्पन्नाचा निम्मा भाग हा आरोग्य व्यवस्थेवर खर्च होतो. त्यामुळे त्याची उन्नती तर दूरच पण दरवर्षी तो कर्जाच्या खाईत अजून बुडून त्याची अधोगती होते. या योजनेअंतर्गत फक्त पाच पायल्या धान्यांमध्ये एका व्यक्तीचे एका वर्षासाठी संपूर्ण आरोग्य सुरक्षेची हमी मिळाल्याने या गावातील नागरिकांसाठी हा प्रकल्प संजीवनी ठरेल. 

– आमदार काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)

🔶🔶🔶🔶🔶🔶
 पूर्वी गावात बलुतेदारी पद्धत होती त्याच धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक लुटीपासून बचाव होईल. यात उपचारासाठी लागणारी औषधे ही आरोग्य उपकेंद्र व खाजगी रुग्णालयासाठी शासनाने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत सारख्या विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातून पुरवली जातील. तसेच औषध निर्माण कंपनीच्या माध्यमातून औषधाचा काही भाग डॉक्टरसाठी राखीव असणारा या योजनेमध्ये पूर्ण क्षमतेने वापरला जाईल. अगदी छोट्या छोट्या आजाराच्या उपचारापासून ते गंभीर आजाराच्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया पर्यंत बाळंतपणापासून बायपास पर्यंत सर्व आरोग्य सेवा या योजनेत या गावातील सर्व सहभागी नागरिकांना संपूर्ण वर्षभर मोफत मिळणार आहेत.
– डॉ. सुनील गंधे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version