सर एक धगधगता विचार होते. पारनेरचच नव्हे तर महाराष्ट्राचं विचारवैभव होते. महात्मा फुल्यांना अभिप्रेत असे सत्यशोधक होते. हे सत्यशोधन महाराष्ट्रात रुजलं असतं, तर आपला चेहरामोहरा आणखी वेगळा असता. सरांकडून जोतीसावित्री समजून घेतल्यामुळे माझ्यासह अनेकांच्या आयुष्याच्या दिशा सुस्पष्ट झाल्या. त्यांना अभिवादन करणे म्हणजे त्यांचे विचार जगण्याचा प्रयत्न करणे आणि हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.. 
सरांसोबत चर्चा, खरंतर त्यांना ऐकणं ही वैचारिक पर्वणी असायची. गेल्याच महिन्यात सद्भावना मंचाच्यावतीने डॉ. रफिक सय्यद आणि आम्ही त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं.. तास दीडतास मनमोकळ्या गप्पा झाल्या. ती विचारांची शिदोरी कायम सोबत राहील. 
मित्रहो..प्रिन्सिपल बनता येतं, पण सरांसारखं मॅन ऑफ प्रिन्सिपल बनणं दुर्लभ आहे. गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचे कैवारी माजी आमदार कॉम्रेड भास्करराव पाटील यांचा विचारवारसा त्यांनी जपला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र विभागाचे एचओडी म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. डॉ. आ ह साळुंखे यांच्यासोबत त्यांनी केवळ academic नव्हे तर समाजभान देणारं वैचारिक लेखन केलं. शोधाच्या नव्या वाटा वाचत असताना फुले समजत जातात तसे आपल्या सरांची वैचारिक उंची लक्षात येते. 
🔶🔶🔶🔶🔶
चाळीशेक वर्षांपूर्वीचं सारं काही आठवतंय. सरांचं लयीत चालणं, मोजकं बोलणं, धीरगंभीर स्वभाव सारं काही न्यारं होतं. नैतिक दहशत होती त्यांची. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात तराळ अंतराळकार शंकरराव खरातांना जवळून पाहिलं. राम नगरकरांची रामनगरी ऐकली. ही लाईफटाईम मेमरी सरांमुळे आम्हाला लाभली. कार्यकर्ता बनण्यासाठीचं वैचारिक भरणपोषण आमच्या घडत्या वयात झालं.. सरांना मनोभावे आदरांजली वाहतो.
 
– मारुती शेरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version